फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात सीमाप्रश्न उच्चाधिकार समितीची  बठक आणि त्यानंतर नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री यांच्या समवेत सर्वपक्षीय खासदारांची बठक यामार्गाने सीमाप्रश्न सोडवण्यासाठी गतीने प्रयत्न करण्यात येतील, अशा शब्दांत सहकार मंत्री तथा सीमाप्रश्न समितीचे समन्वयक चंद्रकांत पाटील यांनी सीमावासीयांना सोमवारी आश्वस्त करताना शासनाची भूमिका स्पष्ट केली. केंद्र शासनाला बघ्याची भूमिका न घेता म्हणणे मांडण्यास भाग पाडू ,असा इरादाही त्यांनी व्यक्त केला. तर,ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी सीमाभाग केंद्रशासित  करण्याच्या मागणीला विरोध करीत यामुळे मूळ प्रश्न बाजूला पडण्याची भीती व्यक्त करून त्यांनी २५ लाख मराठी भाषकांना महाराष्ट्रात आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा इरादा व्यक्त केला.
सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी मंत्री पाटील यांनी सोमवारी सीमाभागातील प्रमुखांना येथील विश्राम गृहात चच्रेसाठी निमंत्रित केले होते. या वेळी एन.डी. पाटील, एकीकरण समितीचे वसंतराव पाटील, राम आपटे, राजाभाऊ पाटील, वकील शिवाजी पाटील, माधव चव्हाण, दीपक दळवी, मनोहर किणेकर , अरिवद पाटील, निन्गोजी हुद्दार, समन्वय कक्षाचे अधिकारी रियाझ शेख उपस्थित होते.
बठकीतील निर्णयाची माहिती देताना मंत्री पाटील म्हणाले,की मुख्यमंत्री फडणवीस यांनी समन्वयक म्हणून निवड केल्यानंतरची आजची दुसरी बठक आहे. बठकीत सीमावासीयांनी महाराष्ट्राने आक्रमक होण्याची मागणी केली. राज्यशासन तशी कृतीशील  पावले  टाकत आहे. या प्रश्नाला गती येण्यासाठी १० किंवा १२ फेब्रुवारीस उच्चाधिकार समितीची बठक होणार आहे. त्या वेळी वकिलांशी चर्चा, त्यांची फी, शासनाने सर्वोच्य न्यायालयात मांडण्याचे मुद्दे याबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस  यांच्या समवेत नवी दिल्ली येथे सर्वपक्षीय खासदारांची व्यापक बठक होणार आहे. मुख्यमंत्री हे अटर्नी जनरल यांची  भेट घेवून शासनाची भूमिका मांडतील . राज्यशासन  सीमावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. तसा आक्रमक संदेश कर्नाटक शासनापर्यंत निश्चितपणे पोहोचवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
सीमावासीय मराठी बांधवांनी एकमुखाने रहावे, असा सल्ला देऊन एन. डी. पाटील  म्हणाले, गेल्या सलग ११ निवडणुकांमध्ये बेळगावातून मराठी भाषिक निवडून येत असून यातूनच लोकमत दिसून येते. आता आर-पारची लढाई लढण्यात येईल. सीमावासीय मराठी बांधवांच्या मराठी बाण्याला शासनाने सक्रिय मदत करावी. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले असून तसा, एकीकरण कृती  समितीला  विश्वास वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
शरद  पवारांवर  निशाणा
 साहित्य संमेलनात बोलताना शरद पवार यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यावेळी सीमाप्रश्न सुटला असता असे विधान केले होते, याकडे लक्ष वेधून एन. डी. पाटील यांनी, मग याला जबाबदार कोण यावर पवार बोलत नसल्याबद्दल निशाणा  साधला.