कोल्हापूर जिल्ह्य़ात गुरुवारी २ वेगवेगळ्या अपघातांत २ चालकांसह ३ जण ठार झाले तर ४ जण जखमी झाले आहेत.
तळसंदे येथे आज सकाळी २ ट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले. रत्नागिरी येथून घरगुती गॅस व कोळसा भरून निघालेल्या ट्रकच्या पुढील चालकाच्या बाजूचा टायर फुटला. हा ट्रक समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला. जोरदार धडक बसल्याने कोळसा भरून निघालेल्या ट्रकचा चक्काचूर झाला. या वाहनाचा चालक महंमद यासीन अब्दुल मकानदार (वय २३, रा. विजापूर, कर्नाटक) आणि दुसऱ्या ट्रकचा चालक राजाराम गणपती मोटकट्टे (वय ४२, रा. अंकलखोप, तालुका पलूस) हे दोघेही जागीच ठार झाल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक बी. एस. घोळवे यांनी सांगितले. अपघाताची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
कोल्हापूरजवळील कात्यायनी घाट येथे झालेल्या अपघातात शिक्षक ठार झाले असून त्यांच्या कुटुंबातील ४ जण जखमी झाले आहेत. तानाजी गुंडाप्पा सोनाळकर (वय ४८, रा. जिवबा नाना पार्क) असे त्यांचे नाव आहे. सोनाळकर हे पत्नी माया, मुलगी भक्ती, आम्रपाली व मुलगा प्रबुद्ध यांच्यासह राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे चुलत भावाच्या घरी गेले होते. तेथून ते परत येत असताना कात्यायनी घाट येथे त्यांच्या मोटारीवर झाड कोसळले.
त्यामध्ये सर्वजण जखमी झाले. उपचार सुरू असताना सोनाळकर यांचा मृत्यू झाला. अन्य चौघे किरकोळ जखमी झाले असून खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. सोनाळकर हे येथील विद्यापीठ प्रशालेत सहायक शिक्षक आहेत.