वर्षाअखेरीस ३१ डिसेंबरला होणाऱ्या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी, अपप्रकार रोखण्यासाठी हिंदू जनजागृती समितीने कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड आणि विशाळगड येथे ‘गड संरक्षण मोहीम’ आयोजित केली आहे.
१ जानेवारीला नववर्ष साजरे करण्याच्या नावाखाली ३१ डिसेंबरच्या रात्री अपप्रकार घडतात. छत्रपती शिवाजीमहाराजांनी स्थापन केलेले गड, किल्ले यांवर अनेक हिंदू नववर्ष साजरा करण्याच्या नावाखाली मौजमजा करतात. तेथे मद्यपान करणे, चित्रपटातील गाणी लावून त्यावर अंगविक्षेप करणे, पत्ते खेळणे, कचरा टाकून गडावर अस्वच्छता करणे आदी चुकीचे प्रकार चालतात. यामुळे गडांचे पावित्र्य नष्ट होत आहे. हे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदू जनजागृती समितीने पन्हाळगडाच्या पायथ्याशी पहारा, पोलिसांच्या साहाय्याने साहित्य पडताळणी करणे अशी ‘गड संरक्षण मोहीम’ आयोजित केली आहे. मोहिमेची वेळ सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत असणार आहे, तर विशाळगडावर पहारा ठेवण्यात येईल. या मोहिमेत मलकापूर, कोल्हापूर येथील शिवसेनेची युवा सेना, बजरंग दल, भाजप या संघटना सहभागी होणार आहेत. या मोहिमेत ज्यांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी पन्हाळगड येथील ९७६६३९३९२० आणि विशाळगड येथे ८००७७१८८८९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.