बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या ऑनलाइन औषधी व्यापाराच्या निषेधार्थ औषध विक्रेत्या संघटनांनी उद्या बुधवारी एकदिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. याच मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व औषध दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी व अन्न व औषध प्रशासनास देण्यात येणार आहे.
सध्या बेकायदेशीरपणे ऑनलाइन औषध विक्री सुरू आहे. याचे अनेक दुष्परिणाम आहेत. कमी दर्जाचे व बनावट औषधांचा शिरकाव होण्याची शक्यता आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय वेदनाशमक अथवा अन्य औषधांच्या वापरास चालना मिळण्याची शक्यता आहे. युवकांमध्ये नशेच्या औषधांचा वापरास मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे देशभरातील औषध व्यावसायिकांनी देशव्यापी बंद पुकारला आहे. यामध्ये जिल्ह्यातील केमिस्ट सभासदांनी सहभागी होण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे सह सचिव तसेच कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी केले. या संपास चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने पािठबा देण्यात आला आहे.