दवाखान्याची नोंदणी व कामगार पुरविण्याचा ठेका मंजूर करण्यासाठी २५ हजारांची लाच लघुटंकलेखकाकरवी (स्टेनो) स्वीकारताना सहायक कामगार आयुक्तासह स्टेनो लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले. सहायक कामगार आयुक्त सुहास कदम यांचा पोलीस शोध घेत असून स्टेनो संजय जगन्नाथ पाटील (वय ३२, रा. माधवनगर रोड, सांगली) याला लाचलुचपतने अटक केली. या बाबतची फिर्याद विजय शिवाजी हंकारे (मंगेशकरनगर, उंचगाव, ता. करवीर) यांनी दिली.
विजय हंकारे यांचा रुग्णालयांना कंत्राटी कामगार पुरविण्याचा व्यवसाय आहे. हंकारे यांचे नातेवाईक डॉ. कौस्तुभ वाईकर यांचे बेलबाग येथे प्राईम हॉस्पिटल नावाचे रुग्णालय आहे. या रुग्णालयात कामगार पुरविण्याचा ठेका विजय हंकारे घेणार होते. यासाठी हंकारे यांनी तीन महिन्यांपूर्वी सहायक कामगार आयुक्तालयाकडे अर्ज केला होता. यानंतर हंकारे यांनी आयुक्त कदम यांची भेट घेतली. यावेळी कदम यांनी कामगार पुरविण्याचा परवाना देण्यापूर्वी तुम्हाला तुमचे नातेवाईक वाईकर यांच्या दवाखान्याची नोंदणी कामगार आयुक्तांकडे करणे बंधनकारक आहे. ही नोंदणी झाल्यानंतर ८ दिवसांनी तुम्हाला कामगार पुरविण्याचा परवाना मिळेल असे सांगितले. पंधरा दिवसांनी आयुक्त सुहास कदम यांनी वाईकर यांच्या अर्जामध्ये काही तांत्रिक त्रुटी काढल्या व हंकारे यांना नव्याने अर्ज करण्यास सांगितले. नव्याने अर्ज केल्यानंतर हंकारे यांनी कार्यालयातील लघुटंकलेखक संजय पाटील यांची भेट घेतली. पाटील याने या कामासाठी आयुक्त सुहास कदम यांना २५ हजार, तर मला २ हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले व पसे घेऊन सोमवारनंतर भेटण्यास सांगितले.
हंकारे यांनी लाचलुचपत खात्याशी संपर्क करून या बाबतची रीतसर तक्रार नोंदविली. हंकारे यांनी बुधवार (दि. ४) रोजी आयुक्त सुहास कदम यांची कार्यालयात भेट घेतली. भेटीदरम्यान कदम यांनी २५ हजार रुपयांची मागणी केली. सदरची रक्कम गुरुवारी संजय पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले. ठरल्यानुसार हंकारे गुरुवारी शाहुपुरीतील कार्यालयात लाचेच्या रकमेसह दाखल झाले. त्यांनी संजय पाटील यांची भेट घेऊन कदम यांचे २५ हजार रुपये दिले व तुमचे पसे तीन नंतर घेऊन येतो असे सांगितले. याचवेळी लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी संजय पाटील यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले.