कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदारयाद्यांचा घोळ आता मुंबईपर्यंत पोहोचला आहे. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन मतदारयादीतील सावळा गोंधळाची कल्पना देऊन हरकतीचे निरसन होईपर्यंत निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावर निवडणूक आयोगाचे मुख्य सहाय यांनी महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांना मतदारयादीतील चुका त्वरित सुधाराव्यात अशा सूचना दिल्या आहेत.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप मतदारयाद्यांमध्ये बराच घोळ झाला होता. त्यावर हरकती मागितल्यावर तक्रारींचा पाऊस पडला होता. मात्र, त्यातील दोष दुरुस्त करण्याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. या प्रश्नी मंगळवारी आमदार क्षीरसागर यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांना धारेवर धरले होते. तर आज राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य सहाय यांची भेट घेऊन त्यांना मतदारयादीमध्ये निर्माण झालेला सावळा गोंधळ लक्षात आणून दिला.
महापालिका प्रशासनाकडून विशिष्ट उमेदवाराला स्थिती अनुकूल व्हावी अशा पद्धतीच्या मतदारयाद्या बनवल्या असल्याचे विविध उदाहरणांसह निदर्शनास आणून दिले. राजकीय दबावाचा वापर करून अधिकाऱ्यांशी संगनमत करण्यात आल्याने मतदारयादीतील गोंधळ संपवावा, हरकतीचे योग्य निरसन करून योग्य मतदारयादी प्रसिद्ध करण्यात यावी. तोपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावा, अशी मागणी क्षीरसागर यांनी केली. त्यावर सहाय यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांना मतदारयादीतील गोंधळ निरुत्तर चूकविरहित मतदारयादी बनविण्याच्या सूचना दिल्या आहेत. याची दखल घेत आयुक्त व प्रशासन कोणती भूमिका घेणार, हे लक्षवेधी ठरले आहे.