आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या धुवांधार कामगिरीच्या जोरावर ‘द डॉन ऑफ क्रिकेट’ असा लौकीक गाजवलेल्या सर डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन म्हणजेच सर डॉन ब्रॅडमन यांचा आज १०६ वा वाढदिवस. या अवलियाने क्रिकेट क्षेत्रात गाठलेले यशोशिखर पाहता ब्रॅडमन यांना ‘गॉड ऑफ क्रिकेट’ असेही संबोधले गेले.
फलंदाजीतील आपल्या नजाकती फटकेबाजीने ब्रॅडमन यांनी सगळ्यांची मने जिंकली होती. आजही युवा फलंदाज ब्रॅडमन यांना आदर्श ठेवून क्रिकेटचे धडे गिरवतात. ब्रॅडमन यांनी कारकिर्दीमध्ये धावांच्या राशी उभ्या केल्या होत्या. त्यांच्या अखेरच्या डावापूर्वी त्यांची सरासरी ९९.९४ इतकी होती. यावरूनच त्यांच्या फलंदाजीचा आवाका लक्षात येईल. जर त्यांनी अखेरच्या डावात चार धावा केल्या असत्या तर त्यांच्या सरासरीने शंभरी गाठली असती. पण ही सरासरीची शंभरी थोडक्यात हुकली आणि इंग्लंडचे माजी लेग स्पिनर इरिक होलिज यांच्या चेंडुवर त्यांनी आपली विकेट शुन्यावर गमावली. तरीसुद्धा कसोटी क्रिकेट मध्ये ९९.९४ च्या सरासरीने खेळणआरे डॉन ब्रॅडमन यांचे नाव आजही उत्तम कसोटी सरासरी राखणाऱया फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.
९१ वर्षांचे असताना २००१ साली त्यांचे निधन झाले. त्यानंतर ब्रॅडमन यांच्या राहत्या घराचे वास्तुसंग्रहालयात रुपांतर करण्यात आले. यामध्ये ब्रॅडमन यांच्या सर्व वस्तू ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाकडून जपण्यात आल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या वास्तुसंग्रहालयाला क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने भेट देऊन ब्रॅडमन यांचे स्मरण करतात. क्रिकेटच्या या महारथीला मानाचा मुजरा..