आतापर्यंत तुम्ही क्रिकेटमध्ये ६ चेंडुंवर ६ षटकार खेचण्याचा कारनामा पाहिला असेल. स्थानिक पातळीवर काही वेळा ६ चेंडुंवर ६ चौकारही ठोकताना अनेक फलंदाजांना पाहिलं असेल. मात्र लंडनमध्ये एका १३ वर्षाच्या गोलंदाजाने ६ चेंडुंमध्ये ६ फलंदाजांना माघारी धाडलं आहे. ल्यूक रॉबिन्सन असं या गोलंदाजाचं नाव असून, लंडनमधल्या १३ वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत ल्यूकने हा पराक्रम केला आहे.महत्वाची गोष्ट म्हणजे, ल्यूकने घेतलेले सर्व फलंदाजांना त्रिफळाचीत करत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

ल्यूक हा फिलाडेल्फिया क्रिकेट क्लबकडून स्थानिक स्पर्धांमध्ये खेळतो. त्याचा हा अनोखा विक्रम पहायला त्याचा परिवार मैदानात हजर होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ल्यूकचे बाबा स्टिफन हे सामन्यात पंच म्हणून काम पाहत होते. ल्यूकने केलेला हा विक्रम नोंद करुन घेण्याचा मानही त्याची आई हेलन यांना मिळाला. कारण हेलन रॉबिन्सन या सामन्यात ‘स्कोअरर’ म्हणून काम पाहत होत्या. या सामन्यात ल्यूकचा भाऊ मॅथ्यू हा सामन्यात क्षेत्ररक्षण करत होता. त्यामुळे आपल्या परिवारातील सदस्याने केलेल्या विक्रमाचे साक्षीदार होण्याचं अनोखं भाग्य रॉबिन्सन परिवाराला मिळालं. सध्या ल्यूकने केलेल्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

ल्यूकने केलेली कामगिरीह ही खरचं धक्कादायक आहे. मी देखील या मैदानात सिनीअर संघाकडून अनेक वेळा खेळलो आहे. अनेक वेळा मी माझ्या संघासाठी खेळताना हॅटट्रिकही केली आहे. मात्र ल्यूकने केलेली गोलंदाजी ही भन्नाट होती. त्याने ६ बळी घेतल्यानंतर काही वेळासाठी माझाच माझ्यावर विश्वास बसत नव्हता. त्यामुळे आपल्या मुलाने केलेल्या कामगिरीचा आपल्याला अभिमान असल्याची भावना ल्यूकच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.