भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पध्र्यामध्ये अ‍ॅडलेड ओव्हल येथे १५ फेब्रुवारीला होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकातील लढतीसाठी २० हजार भारतीय चाहत्यांची उपस्थिती लाभेल, असा विश्वास दक्षिण ऑस्ट्रेलियन सरकारला वाटत आहे. ५० हजारपेक्षा जास्त क्षमतेच्या अ‍ॅडलेड स्टेडियममध्ये होणाऱ्या या लढतीसाठीची सर्वसाधारण चाहत्यांसाठीची तिकिटे अवघ्या १२ मिनिटांत विकली गेली आहेत.
‘‘अ‍ॅडलेड स्टेडियमला नव्याने झळाळी देण्यात आली आहे. सर्वसाधारण तिकिटे काही मिनिटांतच विकली गेल्यानंतर अनेक जण पॅकेज घेऊन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येण्यासाठी उत्सुक आहेत. भारतातून किमान २० हजार चाहते या सामन्याचा आनंद लुटतील, अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असलेले भारत आणि पाकिस्तानचे चाहतेही या सामन्याला उपस्थित राहणार आहेत,’’ असे दक्षिण ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान जॉन रॉउ यांनी सांगितले.
क्रिकेट विश्वचषकात भारताने अद्याप पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या या महामुकाबल्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी होणार आहे.
‘‘भारत-पाकिस्तान लढतीचे आयोजन करण्याची संधी आम्हाला मिळावी, अशी आमची इच्छा होती. भारताशी आमचे सांस्कृतिक, खेळ आणि व्यापाराच्या बाबतीत चांगले संबंध आहेत. आता या सामन्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,’’ असे अ‍ॅडलेड ओव्हल स्टेडियमचे मालकी हक्क असलेल्या दक्षिण ऑस्ट्रेलिया सरकारकडून सांगण्यात आले.
या ऐतिहासिक मैदानावर क्रिकेट विश्वचषकातील चार सामने खेळवण्यात येणार आहेत.