२०१८ साली रशियात होणाऱ्या फिफा विश्वचषकासाठी इजिप्तचा संघ पात्र ठरलाय. इंग्लिश प्रिमिअर लीग स्पर्धेत ‘लिव्हरपूल’ या क्लबकडून खेळणाऱ्या मोहम्मद सलाहने पेनल्टी कॉर्नरवर गोल झळकावत इजिप्तला विश्वचषक स्पर्धेचं तिकीट मिळवून दिलं. या विजयासह गेल्या २७ वर्षांची इजिप्तची तपश्चर्या फळाला आली आहे. कांगोवर २-१ ने मात करत इजिप्तने फिफाच्या विश्वचषक स्पर्धेत आपलं स्थान पक्क केलं.

अवश्य वाचा – नेदरलँड्सचे भवितव्य अधांतरी

विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होण्याकरता इजिप्तच्या संघाला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक होता. सामन्यात बरोबरी साधूनही इजिप्तचं काम भागणारं नव्हतं. यावेळी मोहम्मद सलाहने आपला अनुभवी खेळ करत इजिप्तला सामन्यात विजय मिळवून दिला. १९९० साली इजिप्तचा संघ आपली शेवटची विश्वचषक स्पर्धा खेळला होती. यानंतर इजिप्तच्या पदरात सतत अपयश पडतं होतं, मात्र आपल्या जिद्दीच्या जोरावर इजिप्तने हा २७ वर्षांचा वनवास अखेर संपवला.

या सामन्याआधी प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती. इजिप्तचे प्रशिक्षक हेक्टर कुपर यांना सामन्याआधी उच्च रक्तदाबाचा त्रास व्हायला लागला. मात्र आपल्या संघासाठी महत्वाचा सामना असल्याने कुपर यांनी तात्काळ वैद्यकीय उपचार घेत सामन्यात आपली उपस्थिती लावली. हा काळ प्रशिक्षक म्हणून आपल्यासाठी प्रचंड खडतर असल्याचंही प्रशिक्षक कुपर यांनी मान्य केलं.