भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या डावात गुरूवारी ऑस्ट्रेलियन सलामवीरांना लवकर माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळाले. सुरूवातीला नवीन चेंडूवर भारतीय गोलंदाजांनी स्वैर मारा करत प्रतिस्पर्धी संघाला विनाकारण धावा बहाल केल्या. उमेश यादवने घेतलेल्या डेव्हिड वॉर्नरच्या बळीचा अपवाद वगळता भारतीय संघाला यश मिळताना दिसत नव्हते. मात्र, चहापानापूर्वी भारतीय गोलंदाजांनी शेन वॉटसन आणि क्रिस रॉजर्स यांना झटपट बाद करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर चांगला जम बसविलेल्या शॉन मार्श देखील ३२ धावांवर माघारी परतला.परंतु, अंधुक प्रकाशामुळे दुसऱया दिवसाचा खेळ संपण्याच्या नऊ षटकांआधीच खेळ थांबवावा लागला. दुसऱया दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ४ बाद २२१ अशी आहे. कर्णधार स्मिथ ६५ तर मिचेल मार्श ७ धावांवर नाबाद आहेत.
तत्पूर्वी दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर भारताचा पहिला डाव ४०८ धावांवर संपुष्टात आल्याने कसोटीवर वर्चस्व मिळवण्याची संधी भारताने दवडली. कालच्या ४ बाद ३११ धावसंख्येवरून डावाची सुरूवात करणाऱ्या भारताला जोश हॅझलवूडच्या भेदक गोलंदाजीमुळे फार मोठी मजल मारता आली नाही. पहिल्या डावात पाच बळी घेणाऱ्या हॅझलवुडने भारताला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. दरम्यान काल ७५ धावांवर खेळत असणारा अजिंक्य रहाणे ८१ धावा झाल्या असतानाच झटपट बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माही ३२ धावांवर तंबूत परतल्याने भारताची अवस्था ६ बाद ३२६ अशी झाली होती. मात्र, कर्णधार धोनीने अश्विनच्या साथीने ५७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत भारताला ४०० धावांचा टप्पा गाठून देण्यास मदत केली. महेंद्रसिंग धोनीने ३३ तर अश्विनने ३५ धावांची उपयुक्त खेळी केली.
स्कोअर कार्ड-