लॉर्ड्स, हे नाव घेतल्यावर प्रत्येक क्रिकेटप्रेमीबरोबर खेळाडूंच्या मनामध्ये आदराची भावना निर्माण होते आणि मस्तक लीन होते. गुरुवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यामधल्या दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार असून ही क्रिकेटची पंढरी आता दुमदुमणार आहे. जय-पराजयापेक्षा या मैदानावरील खेळ पाहण्याचे भाग्य मिळणार असल्याची काही जणांची भावना असेलही पण दोन्ही संघ विजयासाठीच शिकस्त करतील, दमदार कामगिरीचा जप कायम ठेवत संघाला विजय मिळवून देण्यासाठी कसलीही तमा बाळगणार नाही. पहिल्या सामन्यात बेजान खेळपट्टीवर दोन्ही संघांतील गोलंदाजांचा चांगला घाम निघाला होता. पण लॉर्ड्सची खेळपट्टी ही गोलंदाजांना पोषक ठरणारी समजली जाते आणि ही खेळपट्टीची परंपरा या सामन्यामध्येही कायम राहणार आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये गोलंदाजीचा गजर पाहायला मिळेल, तर फलंदाजांना या खेळपट्टीवर पाय रोवून फलंदाजी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. त्यामुळे या सामन्यांमध्ये फलंदाजांची खरी कसोटी असेल. पहिल्या कसोटी सामन्यांमध्ये दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये जे काही घडले आहे, ते सारे विसरून क्रिकेटच्या या पंढरीतील हा सामना खेळभावनेनेच खेळला जावा, अशी क्रिकेटचाहत्यांची अपेक्षा असेल.
पहिल्या कसोटीतील निर्जीव खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी बजावली होती. लॉर्ड्सच्या हिरवळीवर त्यांच्यासाठी नेत्रदीपक कामगिरी करण्याची संधी असेल. मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा यांना या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना लवकर माघारी धाडण्याची संधी असेल. भारतीय फलंदाजांना मात्र या सामन्यामध्ये जरा जपूनच खेळावे लागेल. शिखर धवनला अजूनही फॉर्म गवसलेला नाही. मुरली विजयने पहिल्या सामन्यात शतक झळकावलेले असले तरी या सामन्यात त्याची खरी परीक्षा असेल. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांच्यासाठी हा लॉर्ड्सवरचा पहिलाच सामना असल्याने त्यांच्यावर दडपण असण्याची शक्यता आहे. महेंद्रसिंग धोनी फलंदाजीमध्ये संयमीपणा आणणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कारण गेल्या सामन्यामध्ये त्याने ८२ धावांवर असताना एकेरी धाव घेण्याचा नादात आत्मघात केला होता. रवींद्र जडेजाला फलंदाज म्हणून अजूनही कसोटी क्रिकेटमध्ये आपली ओळख बनवता आलेली नसल्याने त्याच्यासाठी हा सामना सोपा नसेल. स्टुअर्ट बिन्नीला या सामन्यात संधी मिळणार की रोहित शर्माला खेळवणार, हा निर्णय घेणे संघासाठी कठीण असेल. लॉर्ड्सवर भारताला आतापर्यंतच्या १६ सामन्यांमध्ये फक्त एकच सामना जिंकता आला असून तब्बल २८ वर्षांनी भारतीय संघ विजयाचा उपवास संपवणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
इंग्लंडच्या संघातील मधल्या फळीतील फलंदाज जो रूट दमदार फॉर्मात आहे. पहिल्या सामन्यात त्याने नाबाद १५४ धावांची अभेद्य खेळी साकारली होती. पण अन्य फलंदाजांना आपली छाप पाडता आली नव्हती. जेम्स अँडरसनवर आयसीसी कारवाई करणार असली तरी ती या सामन्यात होण्याची शक्यता धूसर दिसत आहे. त्यामुळे अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड ही जोडगोळी भारतीय संघाच्या नाकी नऊ आणू शकते.
लॉर्ड्सची खेळपट्टी आतापर्यंत भारताला फलदायी ठरलेली नाही. आतापर्यंत भारताने लॉर्ड्सवर १६ कसोटी सामने खेळले असून त्यापैकी ११ सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे, तर चार सामने अनिर्णीत अवस्थेत सुटले आहेत. १९८६ साली भारताने लॉर्ड्सवर एकमेव विजय मिळवलेला आहे. त्यामुळे भारतीय संघ विजयी पताका रोवणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.

प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार व यष्टिरक्षक), शिखर धवन, मुरली विजय, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, स्टुअर्ट बिन्नी, आर. अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, इश्वर पांडे, पंकज सिंग, वरुण आरोन आणि वृद्धिमान साहा.
इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), मोइन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, इयान बेल, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस जॉर्डन, लिआम प्लंकेट, मॅट प्रायर (यष्टिरक्षक), सॅम रॉबसन, जो रूट, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स आणि सायमन केरिगन.
सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वा. पासून.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि ३ वर.

खेळभावनेविषयी आपण सातत्याने बोलत असतो. क्रिकेटपटूंना आचारसंहितेचे पालन करायचे असते. खेळाडू आक्रमक असू शकतो, परंतु त्याने मर्यादा ओलांडता कामा नये. याप्रकरणी जडेजाची चूक आहे असे मला वाटत नाही. कोणीही शारीरिक संपर्क करू शकत नाही. अँडरसनला एकटय़ाला लक्ष्य करण्याचा प्रश्नच नाही. हे प्रकरण जडेजाने संयमाने हाताळले. आम्ही खेळ खेळतो आणि असंख्य जण आम्हाला पाहात असतात. आमच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. या घटनेमुळे आमच्या खेळावर परिणाम होणार नाही. माझ्या नियंत्रणात ज्या गोष्टी आहेत त्या सांभाळून वाटचाल करण्याचा माझा प्रयत्न असेल.
महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार

अँडरसनविरोधात तक्रार दाखल करत लक्ष्य करणे भारताच्या डावपेचांचा भाग आहे. अशी परिस्थिती उद्भवली होती याचेच आश्चर्य वाटते आहे. सर्वस्व झोकून देऊन खेळण्याच्या जेम्सच्या वृत्तीमुळे हे घडले असावे आणि हा प्रकार एका घटनेपुरताच असावा. या संदर्भात ईसीबीचे पदाधिकारी, प्रशिक्षक पीटर मूर्स यांच्याशी चर्चा केली असून आम्ही जडेजाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
– अ‍ॅलिस्टर कुक, इंग्लंडचा कर्णधार