अ‍ॅथलेटिक्स विश्वात खळबळ उडवून देणाऱ्या उत्तेजक सेवनांच्या प्रकरणात ५ टक्के भारतीय खेळाडूही सामील असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र हा प्रकार कसा होतो याचे कोडे क्षेत्रातील तज्ञांनाही अद्याप उलगडलेले नाही.
आंतरराष्ट्रीय संघटना अ‍ॅथलेटिक्स महासंघाने जगभरातील ५,००० अ‍ॅथलिट्सच्या १२,००० रक्तचाचणी केल्या. या चाचण्यांच्या अहवालातून अ‍ॅथलिट्स उत्तेजकांचा सर्रास वापर करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या चाचण्यांचे अहवाल जर्मनस्थित वृत्तवाहिनी ‘एआरडी’ आणि ब्रिटनच्या ‘संडे टाइम्स’च्या हाती लागले.
२०१२ ऑलिम्पिक आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदकविजेत्या काही खेळाडूंच्या अहवालातही संशयास्पद गोष्टी आढळल्या आहेत. संडे टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार १२,००० रक्त चाचण्यांपैकी ५ टक्के आक्षेपार्ह रक्त चाचणी अहवाल भारतीय अ‍ॅथलिट्सचे असल्याचे उघड झाले आहे. ‘‘इरयथ्रोपोइटेन हे उत्तेजक भारतात उपलब्ध आहे. भारतीय अ‍ॅथलिट्सनी या प्रतिबंधिक उत्तेजकाचे सेवन केले असेल तर चाचणीत तेच समोर आले आहे,’’ असे उत्तेजक संदर्भातील भारतीय तज्ञ पीएसम चंद्रन यांनी सांगितले.
‘‘रक्ताच्या माध्यमातून उत्तेजक सेवन दोनप्रकारे होऊ शकते. स्वत:चे रक्त जमा करून ते थंड वातावरणात साठवू शकतो. ठराविक कालावधीनंतर म्हणजेच स्पर्धेपूर्वी हे रक्त शरीराला पुरवू शकतो. मात्र या क्लिष्ट प्रक्रियेपेक्षा इरयथ्रोपोइटेन उत्तेजक इंजेक्शनच्या माध्यमातून अ‍ॅथलिट्स घेऊ शकतात. भारतात हे उत्तेजक उपलब्ध असल्याने भारतीय अ‍ॅथलिट्स दोषी आढळू शकतात,’’ असे त्यांनी पुढे सांगितले.
गेल्या दोन वर्षांपासून उत्तेजकविरोधी संघटनेने खेळाडूंची रक्त चाचणीचे नमुने गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दोषी आढळलेल्या भारतीय अ‍ॅथलिट्सचे नमुने ऑलिम्पिक किंवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने किंवा जागतिक उत्तेजक विरोधी संघटनेने गोळा केलेले असू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ तसेच राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संघटना यांनी यासंदर्भात भाष्य करण्यास नकार दिला. लघवीच्या चाचणीच्या तुलनेत रक्त चाचणी हा वेगळा प्रकार असतो. भारतात अशा स्वरुपाची चाचण्या कमी प्रमाणात होते. मात्र वाडा संघटना जागतिक अजिंक्यपद आणि ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान खेळाडूंची रक्त चाचण्यांचे नमुने गोळा करते. मात्र भारतीय उत्तेजक विरोधी संघटना रक्त चाचणीचे नमुने गोळा करत नाही, असे तज्ञांनी सांगितले. ऑलिम्पिकच्या पाश्र्वभूमीवर भारतीय अ‍ॅथलिट्सची तयारी सुरू झाली आहे. मात्र उत्तेजक सेवन प्रकरणी भारतीय अ‍ॅथलिट्स दोषी आढळल्यास त्यांची कारकीर्द धोक्यात येऊ शकते. दोषी आढळलेल्या भारतीय अ‍ॅथलिट्सची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत.
आरोप सनसनाटी निर्माण करण्यासाठी
* आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल अ‍ॅथलिट्स मोठय़ा प्रमाणावर उत्तेजक सेवनात अडकल्याचे आरोप सनसनाटी निर्माण करण्यासाठी असल्याचे आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने म्हटले आहे.
* खेळाडूंच्या मनात गोंधळ निर्माण करण्याचे काम या आरोपांनी केले असल्याचे संघटनेने म्हणणे आहे. उत्तेजकांचा विळखा सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत असेही महासंघाने स्पष्ट केले. जर्मन वृत्तवाहिनी एआरडी आणि ब्रिटिश वृत्तपत्र संडे टाइम्सच्या वृत्तानंतर अ‍ॅथलेटिक्स महासंघाने तीन दिवस कोणतीही भूमिका मांडली नाही.
* अ‍ॅथलिट्स उत्तेजक सेवन करत असतील तर ते रोखण्यासाठीची यंत्रणा आम्ही राबवतो. मात्र ही यंत्रणाही सर्वसमावेशक नाही. घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या प्रसारमाध्यमांकडेही चाचणीत दोषी आढळल्याचे अंतिम अहवाल नाही.