चॅम्पियन्स करंडकात अंतिम फेरीत भारतीय संघावर पाकिस्तानने मात केली आणि सर्व चाहत्यांचा एकच हिरमोड झाला. अनिल कुंबळे – विराट कोहली वादाप्रमाणेच संघात सिनीअर खेळाडूंच्या जागेबद्दलही मीडियात अनेक चर्चांना उधाण झालं होतं. राहुल द्रवीडनेही युवराज सिंह आणि महेंद्रसिंह धोनीला पर्याय तयार करणं गरजेचं असल्याचं म्हणलं होतं. आगामी विश्वचषकात या दोन्ही खेळाडूंची नेमकी भूमिका काय असेल यावरही राहुलने प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं.

चॅम्पियन्स करंडकापाठोपाठ वेस्ट इंडिज दौऱ्यातही युवराज सिंहची बॅट काही केल्या चालत नाहीये. तुलनेने दुबळा संघ समोर असतानाही युवराज फलंदाजीत काही कमाल दाखवू शकत नाहीये. त्यामुळे आगामी काळात संघात युवराज सिंहची जागा कोण भरुन काढणार यासाठी काही नावं आता समोर यायला लागली आहेत.

राष्ट्रीय स्पर्धा आणि आयपीएलमधली कामगिरी लक्षात घेऊन हे ५ तरुण खेळाडू पुढील काळात युवराज सिंहची जागा भरुन काढू शकतात.

मनीष पांडे –
Manish-Pandey

चॅम्पियन्स करंडकात मनीष पांडेची संघात निवड झाली होती. मात्र दुखापतीमुळे त्याला ऐनवेळी माघार घ्यावी लागली होती. युवराज सिंहच्या अंगात असणारे प्रत्येक गुण मनीष पांडेकडे आहेत. संकटाच्या काळात सामना जिंकून देण, धावफलक सतत हलता ठेवणं मनीष पांडे लिलया करतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मनीष पांडेने भारताला काही सामने जिंकवून दिले आहेत.

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळताना मनीष पांडेचा खेळ, तसेच क्षेत्ररक्षणातली चपळता मनीष पांडेला युवराज सिंहच्या जागेसाठीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर नेऊन ठेवते.

सुरेश रैना –

Cricket - India v Bangladesh - World Twenty20 cricket tournament - Bengaluru, India, 23/03/2016. India's Suresh Raina plays a shot. REUTERS/Danish Siddiqui

गेली १२ वर्ष रैना संघाचा अविभाज्य भाग होता. मात्र गेले काही सामने फॉर्म गमावल्यामुळे त्याला संघातलं आपलं स्थान गमवावं लागलं होतं. मात्र गेल्या काही स्पर्धांमधे रैनाने केलेली फलंदाजी त्याला परत संघात युवराजच्या जागी आणू शकते.

वन-डे, कसोटी आणि टी-२० या तिन्ही प्रकारात खेळण्याचा सुरेश रैनाकडे अनुभव आहे. त्याचप्रमाणे युवराजप्रमाणे तो गोलंदाजीत बळीही मिळवून देतो. त्यामुळे रैनाही या शर्यतीतला महत्वाचा खेळाडू आहे.

श्रेयस अय्यर-

shreyas-iyer

मुंबईकडून रणजी संघात खेळताना श्रेयसने आपली गुणवत्ता अनेकवेळा सिद्ध केली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात आला असताना विराट कोहलीला दुखापत झाल्यानंतर श्रेयसला भारतीय संघात बॅकअप प्लान म्हणून बोलवण्यात आलं होतं. मात्र त्याला सामन्यात खेळण्याची संधी काही मिळाली नाही.

आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघासाठी खेळताना आपण टी-२० प्रकारातही खेळू शकतो हे श्रेयसने सिद्ध केलंय. त्याचसोबत श्रेयस हा वयाने लहान असून संधी मिळाल्यास २०१९ च्या विश्वचषकापर्यंत तो एक परिपूर्ण खेळाडू बनू शकतो.

संजू सॅमसन-

sanju-samson

युवराजपेक्षा संजू सॅमसन हा धोनीची जागा घेण्यात एक चांगला पर्याय ठरु शकतो. आयपीएलमध्ये धडाकेबाज खेळी करतत संजूने आपली गुणवत्ता याआधीच सिद्ध केली आहे. त्याचसोबत त्याच्याकडे झिम्बावेविरुद्धच्या एका टी-२० सामन्याचाही अनुभव आहे.फलंदाजीची शैली, शॉट सिलेक्शन आणि तरुण वय हे ३ मुद्दे संजू धोनीची जागा घेण्यासाठी पुरेसे आहेत.

ऋषभ पंत-

Rishabh-Pant

ऋषभ पंत हा युवराजची जागा घेण्यासाठी सध्याचा सर्वात फेव्हरेट पर्याय मानला जातोय. आयपीएल २०१७ मध्ये पंतने केलेली आक्रमक फटकेबाजी ही त्याला युवराजच्या जागी आणण्यासाठी पुरेशी असल्याचं मानलं जातंय. त्याचसोबत ऋषभ यष्टीरक्षकही असल्यामुळे तो धोनीच्या जागीही संघात हजेरी लावू शकतो असा अनेकांचा अंदाज आहे.

सध्या सुरु असलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात ऋषभची संघात निवड झाली आहे. बहुदा तिसऱ्या सामन्यात पंतला संघात जागाही मिळू शकते. त्यामुळे आगामी विश्वचषकाआधी ऋषभ पंतची संघात जागा पक्की मानली जातेय.