दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेसाठी दिग्गज खेळाडू जाणार
चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेत खेळण्यासाठी भारतीय संघातील कबड्डीपटू जाणार असल्यामुळे या कालखंडात प्रो कबड्डी लीगमधील सहा संघांची अग्निपरीक्षा ठरणार आहे. मात्र या स्पध्रेच्या तारखांची आधीपासून जाणीव असल्यामुळे सर्वच संघांनी त्या दृष्टीने रणनीती आखली आहे.
दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेत खेळणाऱ्या भारतीय संघातील १२ खेळाडूंपैकी प्रो कबड्डीमधील ११ खेळाडू १० फेब्रुवारीला गुवाहाटीकडे प्रयाण करणार आहेत. भारतीय संघातील फक्त महेंदर रेड्डीची कोणत्याही प्रो कबड्डीच्या संघात निवड झालेली नाही. पुणेरी पलटणच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यांत नेमक्या या दिग्गज खेळाडूंची व प्रशिक्षकांची उणीव भासणार आहे. बंगळुरू बुल्स आणि बंगाल वॉरियर्स संघातील कोणताही खेळाडू भारतीय संघात नसल्यामुळे या कालखंडात त्यांचा विजयाचा मार्ग अधिक सुकर होऊ शकेल.
यू मुंबाचे नेतृत्व करणारा अनुप कुमार भारताचे कर्णधार सांभाळणार आहे. अष्टपैलू अनुपसह विशाल माने, मोहित चिल्लर आणि सुरेंदर नाडा ही बचाव फळी यू मुंबाकडे या कालावधीत त्यांच्याकडे नसेल. याचप्रमाणे हुकमी चढाईपटू राहुल चौधरी आणि सुकेश हेगडे नसल्यामुळे तेलुगू टायटन्सलासुद्धा विजयासाठी झगडावे लागणार आहे. पाटणा पायरेट्सला उपकर्णधार संदीप नरवाल आणि रोहित कुमार यांच्याशिवाय खेळावे लागणार आहे. यंदाच्या हंगामातील अतिशय कमकुवत संघ ठरणाऱ्या दबंग दिल्ली संघातील गुणी चढाईपटू काशिलिंग आडके गेल्यास त्यांची अवस्था आणखी बिकट होणार आहे. तर दक्षिण आशियाई स्पध्रेच्या तारखांमध्ये सर्वात जास्त सामने पुणेरी पलटणचे असणार आहेत. दीपक हुडा आणि सूरजित हे धडाकेबाज खेळाडू पुण्याच्या संघात नसतील. तथापि, जयपूर पिंक पँथर्सला द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक बलवान सिंग यांची अनुपस्थिती जाणवणार आहे.
‘‘राहुल चौधरी आणि सुकेश हेगडेसारख्या महत्त्वाच्या खेळाडूंची उणीव आम्हाला नक्की भासेल. परंतु आमचा पुण्यात एकच सामना असल्यामुळे प्रशांत रॉय आणि रोहित बलियान यांच्यासह आम्ही योजना आखू,’’ असे तेलुगू टायटन्सचे प्रशिक्षक रमेश भेंडिगिरी यांनी सांगितले.
दक्षिण आशियाई स्पध्रेच्या आव्हानाविषयी अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू आणि समीक्षक राजू भावसार म्हणाले, ‘‘या आंतरराष्ट्रीय स्पध्रेचे सर्वात जास्त दडपण हे यू मुंबा संघापुढे असेल. कारण त्यांचे चार खेळाडू भारताकडून खेळणार आहेत. मात्र राकेश कुमारसारख्या अनुभवी खेळाडूसोबत ते योग्य रणनीती आखतील. याचप्रमाणे प्रत्येक संघाने त्या पद्धतीने आपल्याकडे योग्य पर्याय उपलब्ध केले असतील, याची मला खात्री आहे.’’