दोनशेव्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतक झळकावले, हे आता सर्वश्रुतच आहे. पण शतकापूर्वीच कोहलीला त्याने झेलबाद केले होते. कारण तसे घडल्याचे कोणत्याही क्रिकेटरसिकाच्या स्मरणात नसेल. कोहली २९ धावांवर असताना मिचेल सँटनरने झेल सोडत जीवदान दिले, हे आता आठवेल. पण झेलबाद झाल्याचे आठवत नसेल. हे घडले ते २५व्या षटकात आणि झेल टिपणारा कुणी न्यूझीलंडचा खेळाडू नसून तो होता मुंबईचा एक उदयोन्मुख क्रिकेटपटू. त्याने ही कामगिरी केली ती अवघ्या १५व्या वर्षी.

अ‍ॅडम मिल्ने २५वे षटक टाकत होता. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कोहलीने ‘लाँग लेग’ला जोरदार हुकचा फटका लगावला. हा चेंडू तिथे उभ्या असलेल्या कॉलिन मुन्रोच्या हातात विसावतो की काय, अशी भीती भारतीय चाहत्यांना होती. पण या चेंडूने मुन्रोला चकवा दिला. चेंडू सीमारेषेपार झाला आणि तिथे उभ्या असलेल्या ‘बॉल बॉय’ आयुष झिमरेने तो नजाकतीने एका हातात झेलला. ते पाहून साऱ्यांच्याच नजरेचे पारणे फिटले. एकीकडे कोहली ४१ धावांवरून षटकार वसूल करत ४७ धावांवर पोहोचला, पण वानखेडेवर चर्चा रंगली होती ती आयुषच्या झेलची. हा झेल वानखेडेवरच्या स्क्रीन्सवर पुन: पुन्हा दाखवण्यात येत होता. त्या झेलनंतर जेव्हा आयुषवर कॅमेरा फिरवला गेला, तेव्हा स्क्रीनवर स्वत:ला पाहून त्याच्या आनंदाला उधाण आले, पण आपण इथे ‘बॉल बॉय’ म्हणून आहोत, हे तो विसरला नाही. वानखेडेवरील प्रेक्षकांसह न्यूझीलंडचे खेळाडूही त्याचे कौतुक करत होते. हे कौतुक त्याने स्वीकारले आणि पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी सज्ज झाला.

आयुष हा व्ही. एन. सुळे गुरुजी शाळेतला विद्यार्थी. ओल्ड पोद्दारीयन्स क्रिकेट क्लबकडूनही तो खेळतो. हॅरिस आणि गाइल्स शिल्डमध्ये त्याची चांगली कामगिरी झाली आहे. मुंबईकडून १४ वर्षांखालील संघाचा तो एक अविभाज्य भाग होता, आता तो मुंबईच्या १६-वर्षांखालील संघासाठी खेळतो. गेल्या वर्षीच्या मोसमात मुंबईकडून खेळताना त्याने १९ बळी मिळवले होते. गेल्या मोसमात महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात त्याने सहा बळी मिळवत ८६ धावांची खेळीही साकारली होती.

मैदानावर प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्याला आपण चेंडू देणारे ‘बॉल बॉय’ पाहतो. पण एखादा त्यांच्यापेक्षा निराळा ठरतो तो त्याच्या चापल्यामुळे. सीमारेषेबाहेर झेल पकडत त्याने त्याची चुणूक दाखवून दिली आहेच, आता सीमारेषेच्या आतमध्ये तो कशी कामगिरी करतो, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.