आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आपल्या फलंदाजीचा आक्रमक बाणा अजूनही कायम आहे. निवृत्ती स्विकारल्याच्या पुढच्याच दिवशी सेहवागने रणजी सामन्यात दमदार शतक ठोकले आहे. हरियाणा संघाकडून खेळणाऱया सेहवागने १७० चेंडूत १६ चौकार आणि तीन खणखणीत षटकारांसह १३६ धावांची खेळी साकारली. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे त्याचे ४२ वे शतक आहे.

कर्नाटकविरुद्धच्या या सामन्यात हरियाणाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर सेहवागने जयंत यादवला हाताशी घेत तिसऱया विकेटसाठी २०६ धावांची भागीदारी रचली आणि आपले शतक पूर्ण केले. या शतकासह सेहवागने आपली धावांची भूक अजूनही संपलेली नसल्याचे सिद्ध करून दाखवले. यादवनेही खणखणीत शतक ठोकले.