दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज ए.बी.डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत सर्वात कमी डावात ८ हजार धावांचा टप्पा गाठून भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम मोडीस काढला आहे. डिव्हिलियर्सने अवघ्या १८२ डावांत ८ हजार धावांचा आकडा गाठला आहे. हा विक्रम याआधी सौरव गांगुलीच्या नावावर होता. सौरवने २०० डावांमध्ये ८ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर सर्वात वेगवान ८ हजार धावा करणाऱयांमध्ये सचिन तेंडुलकर (२१० सामने), वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा(२११ सामने) आणि भारतीय संघाचा एकदिवसीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी (२१४ सामने) यांचे नाव घेतले जाते. या सर्वांना मागे टाकून आता ए.बी.डिव्हिलियर्सने १८२ डावांत ८ हजार धावांचा टप्पा ओलांडून नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱया सामन्यात १९ धावा पूर्ण करून डिव्हिलियर्सने हा विक्रम रचला. डिव्हिलियर्सच्या नावावर सध्या १९० एकदिवसीय सामन्यात १८२ डावांमध्ये ५३.२७ च्या सरासरीने ८०४५ धावा जमा आहेत. फटकेबाजीच्या अनोख्या आणि आक्रमक शैलीसाठी ओळखल्या जाणाऱया ए.बी.डिव्हिलियर्सच्या नावावर याआधी सर्वात वेगवान अर्धशतक, शतक आणि दीडशतक ठोकण्याच्याही विक्रमाची नोंद आहे. आता वेगवान ८ हजार धावांचा विक्रम रचून डिव्हिलियर्सने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.