क्रिकेटचा ‘मिस्टर ३६० डीग्री’ अशी ओळख असलेला एबी डी’व्हिलियर्सच्या फलंदाजी कौशल्याची अनुभूती तर सर्व जगाने घेतली आहे. स्टेडियमच्या कोणत्याही दिशेला फटका मारण्यात डी’व्हिलियर्सचा तरबेज आहे. शिवाय, केवळ क्रिकेटच नाही, तर फुटबॉल, हॉकी या खेळातही डीव्हिलयर्सचा हातखंडा आहे. पण क्रिकेट आपली पहिली आवड असणारे मोठ्या अभिमानाने सांगत दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या डी’व्हिलियर्सचा चिमुकला मुलगा देखील क्रिकेटचे धडे गिरवत आहे.

मैदानात सरावाला जाताना डी’व्हिलियर्स चिमुकल्या अब्राहाम यालाही सोबत घेऊन जातो. आपले डॅडींना फलंदाजी करताना पाहून अब्राहाम देखील हातातील चिमुकल्या बॅटने चेंडूवर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करताना दिसतो. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळताना सरावादरम्यान डी’व्हिलियर्सने एकदा आपल्या मुलालाही सोबत नेलं होतं. डीव्हिलियर्स वॉर्मअप करण्यात व्यस्त असताना चिमुकला अब्राहाम एकटाच आपल्या बॅटिंगचा सराव करताना दिसतो. कडक ऊन असल्यामुळे डोक्यावर गोल टोपी, हातात चिमुकली बॅट आणि डॅडींना आपले जोरदार फटके दाखवण्याची अब्राहामची धडपड यातून जणू तो आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेटमध्येच करिअर करण्याच्या तयारीला लागलाय असं दिसतं. डी’व्हिलियर्सच्या चिमुकल्याची फलंदाजी पाहून तुम्हीही थक्क व्हाल..