भारताचा कनिष्ठ राष्ट्रीय विजेता अभिजित गुप्ता याने चौथ्या मानांकित मॅक्झिम व्हाचिर लाग्रेव्ह याला बरोबरीत रोखले आणि कतार मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत अनपेक्षित कामगिरी केली. गुप्ता याला लाग्रेव्हविरुद्ध विजय मिळविता आला असता मात्र लाग्रेव्ह याने केलेल्या जोरदार बचावामुळे त्याला बरोबरीत समाधान मानावे लागले. त्याचे आता साडेतीन गुण झाले आहेत.
पाचव्या फेरीअखेर पाच गुणांसह आघाडी राखताना नेदरलँड्सच्या अनीष गिरी याने विजेतेपदाच्या आशा कायम राखल्या आहेत. त्याने तिसऱ्या मानांकित शेख्रीयर मामेद्यारोव्ह याच्यावर शानदार विजय मिळविला. त्याने हा डाव केवळ २१ चालींमध्ये जिंकला. स्वीडनच्या निल्स ग्रँडेलियस याने साडेचार गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे. त्याने युक्रेनच्या पाव्हेल एलियानोव्ह याच्यावर आश्चर्यजनक विजय नोंदविला. माजी विश्वविजेता व्लादिमीर क्रामनिक या रशियन खेळाडूंसह आठ खेळाडूंचे प्रत्येकी चार गुण झाले आहेत. क्रामनिकने युक्रेनच्या आंद्रे व्होक याला पराभूत केले. भारताच्या गुप्ता व पी.हरिकृष्ण यांचे प्रत्येकी साडेतीन गुण झाले आहेत. हरिकृष्णला अझरबैजानच्या एलताज सफराली याच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली. शालेय खेळाडू अरविंद चिदंबरम याने पोलंडचा ग्रँडमास्टर अ‍ॅलेक्झांडर मिस्ता याच्यावर सनसनाटी विजय मिळविला. बी.अधीबन या भारतीय खेळाडूने नॉर्वेच्या आर्यन टेरी याला पराभवाचा धक्का दिला.