साधारण सहा वर्षांपूर्वी क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेटचे जाळेच सर्वत्र पसरलेले होते. भारतात फक्त क्रिकेटच खेळला जातो, अशी एक प्रतिमा क्रीडा विश्वामध्ये होती. क्रिकेटचे अवडंबर किंवा स्तोम माजल्याची भावना काही जणांच्या मनात होती. क्रिकेटची पाळेमुळे इथल्या मातीत खोलवर रुजली होती. पण ही कोंडी २००८ सालच्या बीजिंगमधल्या ऑलिम्पिकमध्ये फुटली. अभिनव बिंद्राने इतिहासात पहिल्यांदाच भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावून दिले आणि त्यानंतर भारतातील क्रिकेटेतर खेळांसाठी आशेचा सूर्य उगवला, नाहीतर अन्य खेळांतील खेळाडूंना प्रत्येक गोष्टीसाठी झगडावेच लागायचे. सोयीसुविधा फक्त कागदावर होत्या. त्याची अंमलबजावणी कुठेच होत नव्हती. पण या पदकाने सरकारला जागे केले. फक्त क्रिकेटच नाही तर अन्य खेळामध्येच भारत आपले स्थान निर्माण करू शकतो, ही आशा या सुवर्णपदकाने दिली आणि ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रांती व्हायला सुरुवात झाली. या सुवर्णपदकाकडून बऱ्याच खेळाडूंनी आणि खेळांनी प्रेरणा घेतली आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदक हे फक्त स्वप्न राहिले नाही. मग त्यामध्ये खेळ कोणताही असो़ आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमबाजीबरोबरच कुस्ती, बॅडमिंटन, टेनिस, वेटलिफ्टिंग, स्क्वॉश, बॉक्सिंगसारख्या खेळांमध्ये खेळाडूंबरोबर पदकांची संख्याही वाढत गेली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची दखल घ्यायला सुरुवात झाली. २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताकडून ‘अद्वितीय’ कामगिरी पाहायला मिळाली. आशियाई आणि विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारत मोठय़ा प्रमाणात पदकाला गवसणी घालू लागला.
पूर्वी ज्यांना खेळ परवडायचा तेच खेळताना दिसायचे. बिंद्राही त्यातलाच. त्याच्या घरात शूटिंग रेंज होती, त्यामुळे त्याला सोनेरी कामगिरी करणे शक्य झाले. पण त्याच्या या पदकाने बेताची परिस्थिती असलेल्या खेळाडूंच्या मदतीसाठी हात सरसावले. आंतराष्ट्रीय स्तरावर जिंकून येणाऱ्या खेळाडूंच्या सरकारी पारितोषिकामध्ये वाढ झाली, त्यांना नोकऱ्या मिळायला मोठय़ा प्रमाणात सुरुवात झाली. वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्यांनी पूर्वीपेक्षा जास्त जागा द्यायला सुरुवात झाली आणि फक्त क्रिकेटपटूच सेलिब्रेटी राहिले नाहीत. देशासाठी पदक मिळवणारे खेळाडू नायक ठरायला लागले. त्यांच्याही मिरवणुका निघू लागल्या. या खेळाडूंना समाजात ओळख मिळत गेली, त्यांना मान मिळू लागला, ग्लॅमर पदरी पडले आणि पैसाही आला.
सोमवारी बिंद्राचे ‘ट्विटर’वर निवृत्तीचे संकेत दिल्यावर क्रीडा क्षेत्र हेलावले, काही जणांच्या डोळ्यांत पाणीही आले आणि बीजिंगमधील सुवर्णपदक पुन्हा एकदा डोळ्यांपुढे तरळून गेले. ज्याने बिकट वाट सोपी करत क्रीडा क्षेत्राला अभिनव वळण मिळवून दिले त्या बिंद्राने अजून काही वर्षे खेळायला हवे होते, अशी काही जणांची भावना झाली. पण बिंद्राने आपल्या दुसऱ्या ‘ट्विट’द्वारे रिओ ऑलिम्पिकसाठी तो आशावादी असल्याचे स्पष्ट झाले. फक्त अनुभवी खेळाडू म्हणून जागा अडवून न बसता अन्य खेळाडूला संधी द्यावी, हेच त्याचे आजही विचार आहेत. परंतु आपल्या अखेरच्या आशियाई स्पर्धेत त्याने वैयक्तिक कांस्यपदक पटकावले. सध्याच्या आशियाई स्पर्धेत जितू रायच्या रूपात भारताने एक सुवर्णपदक पटकावले आहे. आता अजून किती सुवर्णपदक मिळतात याची उत्सुकता आहे. बीजिंगमधील सुवर्णपदकाने भारतीयांना आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये आकाश ठेंगणे झाले असले तरी अजूनही अपेक्षित गगनभरारी त्यांना घेता आलेली नाही. पण गरुडभरारी घेता येत नसली तरी चिमणी उडायचे सोडून देत नाही. जिद्द आणि अथक मेहनतीच्या जोरावर भारताच्या आकांक्षांच्या पंखांना ही झेप घेण्याचे बळ मिळो, हीच अपेक्षा करूया!