जगमोहन दालमिया यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या(बीसीसीआय) अध्यक्षपदी रविवारी शशांक मनोहर यांची बिनविरोध निवड झाली. निष्णात वकील आणि प्रशासक शशांक मनोहर यांच्याविषयी काही..

कुशल प्रशासक-
नागपूरस्थित ५८ वर्षीय मनोहर हे व्यवसायाने वकील आहेत, परंतु गेली काही वर्षे क्रिकेट प्रशासनात कार्यरत आहेत. तत्त्वाने चालणारी व्यक्ती आणि कुशल प्रशासक, ही त्यांची खास ओळख आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी त्यांनी तत्कालीन आयपीएलप्रमुख ललित मोदी यांची हकालपट्टी केली होती. २०१३मध्ये जेव्हा स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामुळे बीसीसीआय कलंकित झाले, तेव्हा श्रीनिवासन यांनी अध्यक्षपद सोडायला हवे होते, असे स्पष्ट मत मनोहर यांनी व्यक्त केले होते.

मोबाईल बाळगत नाहीत-
मोबाईल क्रांतीमुळे जग जवळ आल्याचे म्हटले गेले. पण शशांक मनोहर त्यास अपवाद ठरावेत. बीसीसीआयसारख्या बलाढ्य संघटनेच्या अध्यक्षपदी दुसऱयांदा विराजमान झालेले शशांक मनोहर आजही मोबाईल वापरत नाहीत. याविषयी अनेकांना आश्‍चर्य वाटते पण माझ्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असतो. तुमच्या सोयीसाठी मी का मोबाईल बाळगू? मला संपर्क साधायचा असेल तर लँडलाईन आहेच की, असे स्पष्टीकरण मनोहर देतात.

सर्वमान्य चेहरा-
बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी शशांक मनोहर यांचे नाव पुढे येताच. मतभेदाचे आणि विरोधाचे सूर मावळले. अर्ध्या तासाहून कमी वेळ चाललेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मनोहर यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले. मनोहर यांच्या नावाला पूर्व विभागाच्या सर्व सहा सदस्यांनी पाठिंबा दिला. बंगाल क्रिकेट संघटनेचे प्रमुख सौरव गांगुली, त्रिपुराचे प्रमुख सौरभ दासगुप्ता, आसामचे गौतम राय, ओरिसाचे आशीर्वाद बेहरा तसेच झारखंडचे संजय सिंग यांनी मनोहर यांचे नाव बीसीसीआय अध्यक्षपदासाठी प्रस्तावित केले. सर्वमान्य व्यक्तीमत्त्व अध्यक्षपदी विराजमान झाल्यामुळे आगामी काळात बीसीसीआयचे रुपडे आणि विश्वासार्हतेवरून निर्माण झालेले मळभ दूर होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

भ्रष्टाचाराचे कट्टर विरोधक-
भ्रष्टाचाराला प्रखर विरोध करणारे अशी मनोहर यांची बीसीसीआयमध्ये ओळख आहे. देशात क्रिकेटप्रेमींची संख्या सर्वाधिक असल्याने या खेळाच्या विश्वासार्हतेला धक्का पोहोचविणारे कृत्य घडणार नाही, याची काळजी घेण्याची सर्वस्वी जबाबदारी बीसीसीआयची आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराची वाळवी बीसीसीआयला लागणार नाही याची खबरदारी संघटनेतील प्रत्येकाने घेतली पाहिजे, अशी भूमिका आजवर मनोहर वेळोवेळी व्यक्त करीत आले आहेत. आयपीएलमधील सामनानिश्चिती व सट्टेबाजी या गोंधळ समोर आल्यावरही शशांक मनोहर यांनी श्रीनिवासन यांना कडवे बोल सुनावले होते. श्रीनिवासन हेच गैरव्यवहाराचे जनक असल्याची टीका मनोहर यांनी केली होती.