गैरसमजातून क्रीडा पत्रकाराला शिवीगाळ केल्याचे प्रकरण विराट कोहलीला चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. शिवीगाळ करण्यात आलेल्या पत्रकाराने विराटविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित पत्रकाराने कायदेशीर लढाईचा मार्ग स्वीकारल्याने विराट अडचणीत येण्याची शक्यता आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाचा विराटच्या माफीनाम्यासह सारवासारवीचा प्रयत्न विफल ठरण्याची शक्यता आहे.
‘‘गैरसमजातून हा प्रकार घडला. मात्र विराटने आक्षेपार्ह भाषा वापरलेली नाही. विराटने संबंधित पत्रकाराशी संपर्क साधून, त्याची माफी मागितली आहे आणि त्यामुळे हे प्रकरण इथेच संपले आहे,’’ असे भारतीय संघ व्यवस्थापनाने एक निवेदन प्रसिद्ध केले. मात्र संबंधित पत्रकार आणि हिंदुस्तान टाइम्स या राष्ट्रीय वृत्तपत्राचे प्रतिनिधी जसविंदर सिंधू यांनी आयसीसी आणि बीसीसीआयकडे तक्रार दाखल केली आहे.
‘‘माझ्या कार्यालयातील वरिष्ठांशी मी चर्चा केली आहे. त्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांना मी पत्र लिहिले आहे. त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. याप्रकरणी आयसीसीकडेही तक्रार दाखल केली आहे,’’ असे जसविंदर यांनी सांगितले.
आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी विराटने कोणत्या कायद्याचा भंग केला आहे आणि त्यानुसार काय कारवाई होऊ शकते, यासंदर्भात हिंदुस्तान टाइम्स व्यवस्थापन विचार करत असल्याचे जसविंदर यांनी स्पष्ट केले.