उस्मान ख्वाजा आणि अ‍ॅडम व्होग्स यांच्या दमदार शतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ६ बाद ४६३ अशी मजल मारली. ३ बाद १४७ वरुन पुढे खेळताना ख्वाजा-व्होग्स जोडीने चौथ्या विकेटसाठी १६८ धावांची भागीदारी रचली. मार्क क्रेगच्या गोलंदाजीवर चौकार खेचत ख्वाजाने कारकीर्दीतील शतकाची नोंद केली. २५ चौकारांसह १४० धावा करुन ख्वाजा बाद झाला. क्रेगच्याच गोलंदाजीवर चौकार लगावत व्होग्सने सलग तिसऱ्या कसोटीत शतक झळकावले. नाबाद राहत सर्वाधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम व्होग्सने मोडला. पीटर नेव्हिलने ३२ धावा करत व्होग्सला साथ दिली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा व्होग्स १७६ तर पीटर सिडल २९ धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाकडे २८० धावांची आघाडी आहे. न्यूझीलंडतर्फे टीम साऊदी आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी २ बळी घेतले.