भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवणे कठीण असल्याचे ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथने भारतात येताच मान्य केले. या मालिकेत विराट कोहली सर्वात धोकादायक ठरु शकतो, असे तो सराव सामन्यानंतर म्हणाला होता. विराटला रोखणे हेच ऑस्ट्रेलियासाठी मोठे आव्हान असल्याचेही स्मिथने सांगितले. त्यानंतर त्याने आता भारतीय खेळपट्टीवर तारणहार ठरु शकेल, अशा गोलंदाजाच्या नावाचा खुलासा केलायं.

आगामी एकदिवसीय सामन्यात अॅडम झॅम्पा ऑस्ट्रेलियासाठी ट्रम्प कार्ड ठरेल, असा विश्वास स्मिथने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडिअमवरील सरावानंतर व्यक्त केला. स्मिथ म्हणाला की, गेल्या दोन वर्षांपासून फिरकीपटू झॅम्पा चांगली कामगिरी करत आहे. त्याने भारतीय खेळपट्टीवर आयपीएल स्पर्धेत देखील लक्षवेधी कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला संधी मिळाली तर तो मैदानात वेगळी छाप पाडू शकतो. त्याच्याशिवाय अॅस्टन अॅगर आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यातही भारतीय खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता असल्याचे स्मिथ म्हणाला.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू जेम्स फॉकनरही आगामी स्पर्धेत चांगली खेळी करण्यास उत्सुक आहे. आयपीएलमधील अनुभवासह मागीलवर्षी भारतामध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील अनुभवाचा आगामी एकदिवसीय सामन्यात फायदा होईल, असे फॉकनरने यावेळी सांगितले. आगामी एकदिवसीय मालिकेविषयी तो म्हणाला की, भारतीय टीम सध्या चांगली कामगिरी करते आहे. त्यामुळे त्यांना टक्कर देण्यासाठी आम्हाला निश्चितच उच्च दर्जाचा खेळ दाखवावा लागेल. ऑस्ट्रेलिया संघात असणारे अनेक खेळाडू आयपीएल स्पर्धेत सहभागी होते. त्यामुळे या भारतीय खेळपट्टीवर खेळणे आधिक सोयीस्कर ठरेल. फॉकनरला चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळाले नव्हते. यावर तो म्हणाला की, संघातून बाहेर राहणे त्रासदायक होते. त्यामुळे मिळालेल्या संधीनंतर दमदार पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे.