भारताचा ग्रँडमास्टर बी. अधिबन याने बांगलादेशच्या झियाऊर रहेमान याच्यावर शानदार विजय मिळवीत आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत सहाव्या फेरीअखेर संयुक्त आघाडी कायम राखली, त्याचे आता पाच गुण झाले आहेत.
या स्पर्धेत पहिले पाच क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळणार असल्यामुळे या स्पर्धेला मोठे महत्त्व आहे. स्पर्धेच्या केवळ तीन फेऱ्या बाकी आहेत. अधिबन हा माजी विश्वविजेता रुस्तुम कासिझानोव्ह (उजबेकिस्तान) व युओ यानगी (चीन) यांच्यासह आघाडीवर आहे. चीनचे नी हुआ व बुओ झियांगझी हे प्रत्येकी साडेचार गुणांसह त्यांच्या खालोखाल आहेत.
रहेमानविरुद्धच्या डावात सुरुवातीला अधिबनची स्थिती वाईट झाली होती, मात्र डावाच्या मध्याला त्याने खेळावर नियंत्रण मिळविले. त्यातच रहेमान याने केलेल्या चुकांचा त्याला फायदा मिळाला. अधिबन याने वजीर व हत्तीच्या साहाय्याने रहेमानचा बचाव उद्ध्वस्त करत डाव जिंकला.
पाचव्या फेरीत आघाडीवर असलेल्या एस. पी. सेतुरामन या भारतीय खेळाडूला चीनच्या यानगीविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. कृष्णन शशिकिरण याने आपलाच सहकारी देवाशीष दास याला हरविले, तर परिमार्जन नेगी याने इराणच्या पौया इदानी याचा पराभव केला. शशिकिरण व नेगी यांचे प्रत्येकी चार गुण झाले आहेत. सूर्यशेखर गांगुली व अभिजित कुंटे यांच्यातील लढत बरोबरीत सुटली. त्यांचे प्रत्येकी साडेतीन गुण झाले आहेत. अभिजित गुप्ता या राष्ट्रीय विजेत्या खेळाडूने चीनच्या गाओ रुई याला हरवीत आपली गुणसंख्या साडेतीन केली आहे.
महिलांच्या गटात भारताची अव्वल दर्जाची खेळाडू तानिया सचदेव (३.५) हिला इराणच्या अतौसा पौर्काशियान हिच्याविरुद्ध पराभवास सामोरे जावे लागले. पुण्याच्या सौम्या स्वामिनाथन हिने हुल्कार तोहिजरेनोव्हा (उजबेकिस्तान) हिच्यावर आकर्षक विजय मिळविला. सौम्याच्या अन्य सहकारी स्वाती घाटे व ईशा करवडे यांनी आपापल्या प्रतिस्पध्र्याविरुद्ध बरोबरी स्वीकारली. ईशाने व्हिएतनामच्या निग्वेन थिथान अ‍ॅन हिला बरोबरीत रोखले. तिचे अडीच गुण आहेत. स्वातीने निग्वेन थिमाई हुआंग हिला बरोबरीत रोखून आपली गुणसंख्या साडेतीन केली आहे. राष्ट्रीय विजेती मेरी अ‍ॅन गोम्स हिने कझाकिस्तानच्या अशौबायेव्हा बिबिसारा हिच्याविरुद्ध अर्धा गुण स्वीकारला. तिचे आता अडीच गुण झाले आहेत.