अ‍ॅथलेटिक्समधील सुधारणा करण्याबाबत आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (आयएएएफ) सुचविलेली उपाययोजना या खेळाच्या प्रगतीसाठी पूरकच आहेत. जमेका, युक्रेन आदी देशांनी त्यास केलेला विरोध अनावश्यक आहे असे आयएएएफचे सदस्य व भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी सांगितले.

मोनाको येथे नुकतीच आयएएएफची विशेष परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेस सुमारीवाला उपस्थित होते. या परिषदेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील अ‍ॅथलेटिक्सबाबत पंधरा मुद्दय़ांची नवीन उपाययोजनेचा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावास १९७ सदस्यांपैकी १८२ सदस्यांनी मान्यता दिली. मात्र जमेका, ओमान, सेनेगल, युक्रेन, उजबेकिस्तान यांनी विरोध दर्शवित मतदानात भाग घेतला नाही.

बहारिन, गाम्बिया, कझाकिस्तान, सौदी अरेबिया, मलेशिया, लाओस, श्रीलंका, थायलंड, बेनिन, बहारिन, चाड या देशांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले.

सुमारीवाला म्हणाले, गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रामध्ये सुधारणा कराव्यात अशी अनेक सदस्य देशांकडून मागणी केली जात होती. त्यामुळेच विरोध करणाऱ्या देशांबाबत मला कमालीचे आश्चर्य वाटते. जमेकाचा विक्रमवीर उसेन बोल्ट यानेही सुधारणा करण्याबाबत अनुकूलता दर्शविली होती. त्यानेही जमेकाच्या निर्णयाचा कडाडून विरोध करीत संघटकांवर जाहीर टीका केली आहे.