महिला क्रिकेट विश्वचषकाचे यशस्वी आयोजनासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी बीसीसीआय, मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि ओडिशा क्रिकेट असोसिएशन यांची प्रशंसा केली आहे.
स्पर्धा संयोजनात आलेले सर्व अडथळे पार करत ठरलेल्या दिवशी सामने आयोजित केल्याबद्दल बीसीसीआय, एमसीए आणि ओसीए यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. स्पर्धेचे ठिकाण संपूर्णपणे बदलावे लागले असते तर स्पर्धेसाठी ते नुकसानदायी ठरले असते.
महिला क्रिकेट विश्वचषक आम्हाला भारतात आयोजित करायचा होता आणि त्याचे यशस्वी संयोजन करण्यात स्थानिक संघटनांची भूमिका निर्णायक आहे.
पाकिस्तान संघाला सुरक्षित वातावरणात निवास तसेच सरावाची व्यवस्थित सुविधा पुरवणाऱ्या ओडिशा क्रिकेट संघटनेचे आभार मानायला हवेत, अशा शब्दांत रिचर्डसन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.