दबंग मुंबई संघाच्या अफ्फान युसूफचे मत

नेदरलॅण्ड्सचे माजी प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय पुरुष हॉकी संघाने गेल्या दीड वर्षांत अनेक यशशिखर पादाक्रांत केली. चॅम्पियन्स चषक स्पध्रेत रौप्य, आशियाई चॅम्पियन्स चषक स्पध्रेत सुवर्ण, सुलतान अझलन शाह चषक स्पध्रेत रौप्य आणि सॅफ स्पध्रेत रौप्य अशा विविध स्पर्धा भारतीय संघाने गाजवल्या. या यशाचे संपूर्ण श्रेय ओल्टमन्स यांना देताना ते ‘सकारात्मक ऊर्जेचे स्रोत’ असल्याचे मत २२ वर्षीय अफ्फान युसूफ याने व्यक्त केले. आशियाई पुरुष हॉकी अजिंक्यपद चषक स्पध्रेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघात अफ्फानचा मोलाचा वाटा होता. हॉकी इंडिया लीगमध्ये दबंग मुंबईकडून खेळणाऱ्या युसूफने वरिष्ठ  संघातील बदलाचे श्रेय ओल्टमन्स आणि हॉकी इंडिया यांना दिले.

अफ्फानला हॉकीचे बाळकडू घरातूनच मिळाले. त्याचे वडील मोहम्मद युसूफ, आजोबा खुडा दाद आणि काका समीर दाद हे माजी राष्ट्रीय हॉकीपटू होते. त्यामुळे लहानपणापासूनच हॉकीचा लळा अफ्फानला लागला. ‘‘आजोबा, वडील, काका हे माजी हॉकीपटू असल्यामुळे थोडेसे दडपण असतेच, पण त्यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शनही मिळते. ते स्थानिक स्पर्धाचे सामने पाहायला येतात, आंतरराष्ट्रीय सामने टीव्हीवर पाहतात. त्या वेळी ते सामन्यात मी केलेल्या चुका दाखवतात आणि त्यात सुधारणा करून घेतात. मात्र, खेळाडू चढ-उतारांमधून जात असतो त्या वेळी प्रचंड दडपण निर्माण होते. तेव्हा कुटुंबीयांची भूमिका महत्त्वाची ठरते. या दडपणातून सावरण्यासाठी मला ते सहकार्य करतात. त्यांच्या अनुभवाचे कथन करून प्रोत्साहन देतात आणि हे खूप महत्त्वाचे आहे,’’ असे अफ्फान म्हणाला.

डिसेंबर महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये कनिष्ठ संघाने विश्वचषक उंचावला होता. त्या स्पध्रेत पहिल्यांदा वरिष्ठ संघातील खेळाडू व प्रशिक्षक कनिष्ठ खेळाडूंना प्रोत्साहन देताना पाहायला मिळाले. याबाबत अफ्फान म्हणाला, ‘‘वरिष्ठ खेळाडूंची उपस्थिती कनिष्ठ खेळाडूंना प्रेरणा देणारी होती. मध्यंतराच्या काळात हॉकीला चांगला प्रतिसाद मिळत नव्हता, परंतु आता हे चित्र बदलले आहे. हॉकी इंडियाने संघाच्या कामगिरीत सुधारणा व्हावी यासाठी केलेल्या उपाययोजनांचे हे फलित म्हणायला हरकत नाही. सराव शिबिरात कनिष्ठ व वरिष्ठ खेळाडू एकत्र येऊन सराव करतात. खेळीमय वातावरणात हा सराव होत असल्यामुळे खेळाडूंचा बराच फायदा होतो. त्यामुळे सकारात्मक निकाल पाहायला मिळत आहे.’’

परदेशी प्रशिक्षकाची नेमणूक आणि हकालपट्टी या दोन विषयांभोवती घुटमळत राहणाऱ्या हॉकी इंडियाला ओल्टमन्स यांच्या रूपाने दूरदृष्टी असलेला प्रशिक्षक मिळाला आहे. त्यांच्याविषयी अफ्फान म्हणाला़, ‘‘ओल्टमन्स यांनी प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यानंतर संघात बरेच सकारात्मक बदल झाले. रिओ ऑलिम्पिकच्या मोहिमेला सुरुवात करताना आम्ही क्रमवारीत १२व्या स्थानावर होतो आणि आता सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. सहा स्थानांची सुधारणा हे मोठे यश आहे.

साहाय्यक कर्मचाऱ्यांचेही यात मोठे योगदान आहे. प्रत्येक प्रशिक्षकाची शिकवण्याची पद्धत वेगवेगळी असते, परंतु ओल्टमन्स खेळाडूंचा मित्र होऊन संवाद साधतात. वातावरणात प्रसन्नता निर्माण करून ते सर्वाकडून चांगला खेळ करून घेतात.’’

एचआयएलमध्ये दबंगगिरी करण्यासाठी सज्ज

हॉकी इंडिया लीगमुळे भारतीय खेळाडूंना बराच फायदा झाला आहे. कनिष्ठ खेळाडूंना परदेशी खेळाडूंसोबत खेळण्याची संधी या व्यासपीठावर मिळते. त्यामुळे भारतीय हॉकीचा स्तरही उंचावत चालला आहे. हॉकी लीगमध्ये सर्वच संघ कडवे आव्हान उभे करू शकतात. आमची तयारी ‘दबंग’ झाली आहे. त्यामुळे लीगमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे अफ्फान म्हणाला.