कसोटी क्रिकेटमध्ये फलदाजांच्या तंत्रशुद्ध फटक्यांची मेजवानी आपल्याला पाहायला मिळते, तर ट्वेन्टी-२० क्रिकेट विश्वात झटपट धावा वसुल करण्याच्या उद्देशाने फलंदाज लगावत असलेले अनोखे फटके देखील तितकेच लोकप्रिय होतात. पावर प्लेचा जास्तीत जास्त फायदा उचलण्याच्या मानसिकतेने फलंदाज आपल्या फलंदाजीत अनोखे प्रयोग करून चौकार आणि षटकार ठोकण्याचे पर्याय शोधत असतात.

ट्वेन्टी-२० विश्वात ब्रेण्डन मॅक्क्युलम, ग्लेन मेक्सवेल, एबी डीव्हिलियर्स यांनी आपल्या अनोख्या फटक्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. ग्लेन मेक्सवेलचा रिव्हर्स स्विप, दिलशानचा दिलस्कूप, धोनीचा हेलिकॉप्टर शॉट, पीटरसनचा स्विचहीट तर सेहवाग आणि सचिनचा अपर कट हे फटके ट्वेन्टी-२० विश्वात लोकप्रिय ठरले. खरंतर ट्वेन्टी-२० प्रकारात खेळताना फलंदाज कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करण्यास तयार असतो. धावा वसुल करण्यासाठी फलंदाजाने अशे जोखीमपूर्ण फटके खेळणे सहाजिक आहे. नुकतेच अबुधाबी येथे युएई आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या ट्वेन्टी-२० सामन्यात असाच एक अनोखा फटका पाहायला मिळाला.

अफगाणिस्तानचा फलंदाज नजीबुल्लाह जादरान फटका लगावताना पाय घसरुन खेळपट्टीवर पडला पण त्याने लगावलेला हीट थेट सीमारेषेच्या बाहेर पोहोचला होता. त्यामुळे अफगाणिस्तानच्या खात्यात सहा धावा जमा झाल्या. ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणाऱया चेंडूवर नजीबुल्लाहने लागवलेल्या या फटक्याची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा आहे. फलंदाजाने अक्षरश: खेळपट्टीवर झोपून लगावलेला हा फटका ट्वेन्टी-२० विश्वातील आगळ्यावेगळ्या फटक्यांमध्ये नक्कीच नोंदवला जाईल असा आहे. फटका खेळताना पाय घसरून देखील फटक्यामध्ये ताकद असल्याने चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर गेला. अफगाणिस्तानने या सामन्यात युएईवर पाच विकेट्सने मात केली.