मुंबईत क्रिकेटची धुळाक्षरे गिरवणाऱ्या सर्फराझ खानच्या आक्रमक खेळीच्या बळावर १९ वर्षांखालील तिरंगी मालिकेत भारताने बांगलादेशला नमवत जेतेपदावर नाव कोरले.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. मयांक डागर, शुभम मावी, महीपाल लोमरोर यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर बांगलादेशचा डाव ११६ धावांत गुंडाळला. नझमुल हौसेन शंटोने सर्वाधिक ४५ धावा केल्या. बांगलादेशच्या चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. मयांकने ३२ धावांत ३ बळी मिळवले. शुभम आणि महीपाल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना वॉश्गिंटन सुंदर आणि ऋषभ पंत यांनी ३८ धावांची सलामी दिली. सुंदर १२ धावांवर बाद झाला. पाठापोठ ऋषभ पंत २६ धावा करून बाद झाला. अमनदीप खरे भोपळाही फोडू शकला नाही. ३ बाद ४२ अशी स्थिती झालेल्या सर्फराझ खान आणि रिकी भुई यांनी चौथ्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सर्फराझने ९ चौकार आणि ३ षटकारांसह २७ चेंडूत ५९ धावांची वेगवान खेळी केली. चौकार, षटकारांची आतषबाजी करत सर्फराझने बांगलादेशला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही. रिकीने २० धावा करत त्याला चांगली साथ दिली.
निर्णायक खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्फराझला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. एक शतक, दोन अर्धशतकांसह २८२ धावा फटकावणाऱ्या ऋषभ पंतला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.