आयपीएल स्पर्धेच्या सुरूवातीपासूनच महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नाते अतूट राहिले आहे. मात्र, गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे चेन्नई सुपर किंग्जवर स्पर्धेतून निलंबित होण्याची नामुष्की ओढाविली. त्यामुळेच चेन्नई सुपर किंग्जचा संघनायक धोनी आता आयपीएलमध्ये अन्य संघाकडून खेळण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार धोनी नव्या संघाकडून खेळणार आहे. आयपीएलच्या नव्या मोसमासाठी सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सची जागा दोन नवे संघ घेणार आहेत. त्यासाठीच्या निविदा लवकरच मागविण्यात येणार आहेत. आयपीएलमध्ये धोनीच्या नावाचा दबदबा आणि संघाला एकहाती सामना जिंकून देण्याची त्याची क्षमता पाहता या दोन्ही संघाच्या मालकांची पहिली पसंती निश्चितपणे महेंद्रसिंग धोनीच असेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. याशिवाय, चेन्नई आणि राजस्थान या संघातील सहा खेळाडूंना नव्या संघांमध्ये सामावून घेतले जाणार आहे. या सगळ्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज आणि धोनी यांच्यातील नाते संपेल असे नाही. परंतु, तो अन्य संघाकडून खेळेल, असे सूत्रांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोढा समितीने चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सला दोन वर्षांसाठी आयपीएलमधून निलंबित केले होते. मात्र, आयपीएल स्पर्धा १० संघांनिशी खेळवावी असा हेतू असल्याने चेन्नई, राजस्थानच्या जागी दोन नव्या संघांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.