इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठीची कोलकात्यातील ईडन गार्डन्सची खेळपट्टी कशी असावी, या मुद्यावर भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि क्युरेटर प्रबिर मुखर्जी यांच्यात निर्माण झालेल्या वादावर शनिवारी अखेर पडदा टाकण्यात आला. ‘कर्णधाराच्या मर्जीप्रमाणे खेळपट्टीत बदल करणे माझ्या दृष्टीने अनैतिक आहे. हे मी आयुष्यभरात कधीच केले नाही,’ असे सांगत नाराज झालेल्या मुखर्जी यांनी वैद्यकीय रजेवर जाण्याचा इशारा देताच क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने (कॅब) त्यांची मनधरणी केली. त्यामुळे मुखर्जी यांनी आपला निर्णय रद्द केला.
 फिरकीला अनुकूल खेळपट्टी हवी, हे फर्मान वानखेडेवर अंगलट आल्यानंतरही महेंद्रसिंग धोनी आपल्या भूमिकेवर ठाम आहे. ईडन गार्डन्सवरही तिसऱ्या कसोटीसाठी अशीच खेळपट्टी हवी म्हणून आग्रही राहणाऱ्या ‘धोनीहट्टा’पायी येथील जुनेजाणते क्यूरेटर प्रबिर मुखर्जी यांनाच दूर करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतला. त्यानंतर पूर्व विभागाच्या मैदान आणि खेळपट्टी समितीचे प्रतिनिधी आशिष भौमिक यांना ईडन गार्डन्सची खेळपट्टी फिरकीला अनुकूल करण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. पण मुखर्जी यांनी रजेवर जाण्याची धमकी देताच कॅबचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी शिष्टाई करून त्यांना राजी केले. परंतु, धोनीच्या मर्जीप्रमाणे खेळपट्टी फिरकीला अनुकूल बनवणार की मुखर्जीची भूमिका यशस्वी ठरणार, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.    

प्रबिर मुखर्जी यांचे वाद
८३ वर्षीय प्रबिर मुखर्जी हे मागील दोन दशकांहून अधिक काळ ईडन गार्डन्सच्या सेवेत क्यूरेटचे कार्य करीत आहेत. पण त्यांच्या खंबीर भूमिकेमुळे याआधीही समस्या निर्माण झाल्या आहेत. मुखर्जी आणि धोनी यांचे संबंध तसे आधीपासूनच चांगले नव्हते.
 २०११मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अखेरचा सामना जिंकून भारताने त्यांना ‘व्हाइट वॉश’ दिला होता. पण तरीही या खेळपट्टीबाबत धोनीने ‘भयंकर’ असे भाष्य केले होते.
२०१०मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी भारताने अखेरच्या दिवशी शेवटच्या षटकात जिंकली होती. पण धोनीला हवी तशी खेळपट्टी मुखर्जी यांनी दिली नव्हती.