ग्रास कोर्टचा बादशहा रॉजर फेडररने रविवारी टेनिस कोर्टवर दुहेरी विक्रमाची नोंद करत विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले. विम्बल्डनवर आठव्यांदा नाव कोरुन त्याने पीट सॅम्प्रसचा विक्रम मोडित काढला. एवढेच नाही तर त्याने टेनिस स्टार अ‍ॅश यांचा वयाच्या ३१ व्या वर्षी स्पर्धा जिंकण्याचा विक्रमही मोडीत काढला. वयाच्या ३५ व्या वर्षी ही स्पर्धा जिंकण्याची किमया फेडररने साधली. फेडररने दुहेरी विक्रम करत कारकीर्दीतील १९ ग्रॅण्डस्लॅम जिंकले. मात्र राफेल नदालच्या एका विक्रमापासून फेडरर अद्यापही दूर आहे.  एका ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपद पटकवण्याचा करिश्मा नदालच्या नावे आहे. लाल मातीत खेळविण्यात येणाऱ्या फ्रेंच ओपन स्पर्धेत राफेल नदालने तब्बल दहावेळा विजेतपद पटकावले आहे. त्यानंतर फेडरर दुसऱ्या स्थानावर आहे. फेडररने नुकत्याच झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत आठव्यांदा कब्जा केला. या यादीत विम्बल्डन स्पर्धेत सातवेळा विजेतेपद पटकावून पीट सॅम्प्रस तिसऱ्या स्थानावर आहेत. तर जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा तब्बल सहावेळा जिंकली आहे.

विम्बल्डन ओपन स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदालने फारशी चमकदार कामगिरी केलेली नाही. विम्बल्डन ओपन स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदालला चौथ्या फेरीत पराभवाचा धक्का बसलेला आहे. तब्बल ४ तास  चाललेल्या या सामन्यात लग्जमबर्गच्या गिल्स मुलरने नदालला ६-३, ६-४, ३-६, ४-६, १५-१३ अशी कडवी झुंज देत पराभूत केलं. जागतिक क्रमवारीत मुलर हा २६ व्या क्रमांकावर आहे. या पराभवानंतर राफेल नदालची विम्बल्डन स्पर्धेतली खराब कामगिरी अद्यापही कायम राहिल्याचे दिसून आले. फेडररने आज पुन्हा एकदा हिरवळीत आपली मक्तेदारी सिद्ध करत आठव्यांदा विम्बल्डन उंचावले. फेडररच्या ऐतिहासिक विजयानंतरही फेंन्च ओपन स्पर्धेत दहावेळा बाजी मारणारा राफेल नदाल ग्रॅण्डस्लॅमच्या विक्रमापासून फेडरल दूरच आहे.