कौशल सिल्व्हाच्या शानदार १२५ धावांमुळेच श्रीलंकेला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात ३०० धावांपर्यंत मजल गाठता आली. उर्वरित खेळात पाकिस्तानची ५ बाद ११८ अशी दयनीय स्थिती झाली.
सिल्व्हाने चौफेर फटकेबाजी करीत १२५ धावांची खेळी केली. त्याने कुमार संगकारासोबत ११२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यामुळेच लंकेला १०९.३ षटकांत सर्वबाद ३०० धावांपर्यंत मजल गाठता आली. पाकिस्तानकडून रियाझ वहाब व झुल्फिकार बाबर यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांनी पहिले तीन गडी केवळ ३५ धावांत गमावले. त्यानंतर युनूस खान (४७) व कर्णधार मिसबाह उल हक (२०) यांनी ५१ धावांची भागीदारी करीत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ही जोडी फुटल्यानंतर पुन्हा त्यांचा डाव घसरला. श्रीलंकेच्या धम्मिका प्रसादने दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका (पहिला डाव) : १०९.३ षटकांत सर्वबाद ३०० (कौशल सिल्व्हा १२५, कुमार संगकारा ५०, दिनेश चंडीमल २३; रियाझ वहाब ३/७४, झुल्फिकार बाबर ३/६४)
पाकिस्तान (पहिला डाव) : ४१.४ षटकांत ५ बाद ११८ (युनूस खान ४७, मिसबाह उल हक २०; धम्मिका प्रसाद २/२४).