पाकिस्तानने भारतावर दणदणीत विजय मिळवत चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. फखर झमानचे आक्रमक शतक आणि त्यानंतर गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी यांच्यामुळे पाकिस्तानने भारतावर १८० धावांनी विजय मिळवत पहिल्यांदाच चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यानंतर पाकिस्तानचे माजी यष्टिरक्षक रशीद लतिफ यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून पाकिस्तानच्या विजयावर भाष्य केले. ‘पाकिस्तानी क्रिकेट संघाचे अभिनंदन,’ असे लतिफ यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. यासोबतच भारताच्या खेळाडूंवर, विशेषत: वीरेंद्र सेहवागच्या ‘बाप आणि बेटा’ या प्रतिक्रियांवर लतिफ यांनी भाष्य केले आहे.

‘पाकिस्तानच्या या विजयाला कोणतेही उत्तर असू शकत नाही. पाकिस्तानी संघाने आपल्या कामगिरीतूनच सर्व टिकाकारांना उत्तर दिले आहे. भारत आणि पाकिस्तानने सोबत खेळायला आहे. कारण आशिया क्रिकेटची मोठी बाजारपेठ आहे. अॅशेससारख्या मालिकादेखील भारत-पाकिस्तानपेक्षा मोठ्या नाहीत आणि आयसीसीलादेखील माहित आहे. आशियामध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तानसारखे संघ आहेत. हे संघ क्रिकेट जगतावर वर्चस्व गाजवतात. त्यामुळे या देशांमध्ये मालिका व्हायला हव्यात. आयपीएलमध्येदेखील पाकिस्तानी खेळाडूंना संधी मिळायला हवी. यासोबतच भारतीय क्रिकेटपटूदेखील पीएसएलचे भाग व्हायला हवेत,’ असे लतिफ यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने त्याच्या ट्विटमधून अनेकदा पाकिस्तानला लक्ष्य केले आहे. ‘आधी नातवाला (बांगलादेशला) हरवल्यावर आता भारत मुलाला (पाकिस्तानला) पराभूत करेल,’ असे ट्विट सेहवागने केले होते. सेहवागने पाकिस्तानला बेटा आणि भारताला बाप म्हटले होते. यावरदेखील लतिफ यांनी भाष्य केले आहे. ‘कोणीही कोणाचा बाप किंवा बेटा नाही. प्रत्येकाचे क्रिकेटवर प्रेम आहे. बाप-बेटा हे नाते आले कुठून ? तुम्ही हे सुचवू पाहत आहात आणि आम्हाला हे संपवायचे आहे,’ असेदेखील लतिफ यांनी म्हटले.

‘बाप-बेटा हा वाद आम्हाला संपवायचा आहे. आम्ही प्रेमाचा संदेश घेऊन आलो आहोत आणि भारताकडूनदेखील आम्हाला तशाच प्रेमाची अपेक्षा आहे,’ असे रशीद लतिफ यांनी म्हटले आहे. ‘या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत आम्ही भारताविरुद्ध एक सामना गमावला आणि भारताने अंतिम सामना गमावला. खेळात असे होतच असते. भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले आहेत. कपिल देव, सुनील गावसकर, रवी शास्त्री, संजय मांजरेकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, अजय जाडेजा, मोहम्मद अझरुद्दीन ही भारतीय खेळाडूंची यादी न संपणारी आहे,’ असेदेखील राशीद लतिफ यांनी पुढे बोलताना म्हटले.