ड्रेसिंग रूममध्ये सचिन तेंडुलकर याच्याकडून मला खूप बहुमोल सूचना मिळाल्या आहेत. आता आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना मला वीरेंद्र सेहवाग या आणखी एका महान खेळाडूबरोबर खेळण्याची संधी मिळणार आहे, हा माझ्यासाठी बहुमान आहे, असे अष्टपैलू खेळाडू ऋषी धवन याने येथे सांगितले. सचिनबरोबर खेळण्याचे भाग्य मला लाभले. त्याने मला मार्गदर्शन करण्यासाठी वेळ दिला होता. सरावाच्या वेळी माझ्या फलंदाजी व गोलंदाजीच्या शैलीतील कमकुवतपणाबद्दल मला त्याने काही चांगल्या सूचना दिल्या. त्याचा उपयोग मला झाला आहे.
सचिनचा समावेश असलेल्या मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळाले, त्या वेळी विजेत्या संघाचा एक घटक म्हणून मला आनंद घेता आला. हा क्षण माझ्यासाठी अतिशय संस्मरणीय आहे. आता वीरुबरोबर खेळण्याची संधी मला मिळत आहे. त्याचा पुरेपूर फायदा मी घेणार आहे, असे ऋषी याने सांगितले. ऋषी याने यंदाच्या रणजी मौसमात ४५० धावा केल्या आहेत. तसेच त्याने या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्याला किंग्ज इलेव्हनने तीन कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले आहे. ऋषी म्हणाला, मी अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आहे हे सिद्ध करण्यासाठी आयपीएल स्पर्धा माझ्यासाठी उत्तम संधी आहे. मात्र त्याचे कोणतेही दडपण मी घेणार नाही. मी फक्त माझ्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करणार आहे. चांगली कामगिरी झाल्यानंतर भारतीय संघाची दारे मला खुली होतील असा आत्मविश्वास आहे.
ऋषी हा हिमाचल प्रदेशातील मंडी येथील रहिवासी आहे. १३ व्या वर्षी त्याने क्रिकेट कारकीर्दीस प्रारंभ केला. त्यानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये त्याने विविध वयोगटातील स्पर्धामध्ये चमक दाखवीत आयपीएलमधील महत्त्वाचा खेळाडू म्हणून स्थान निर्माण केले आहे.