क्रिकेटच्या मैदानातील रंगत आणखी वाढवण्यासाठी टी-२० नंतर आता टी-१० म्हणजेच १० षटकांची स्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. संयुक्त अरब अमिराती क्रिकेट मंडळाकडून डिसेंबरमध्ये दुबईच्या मैदानात १० षटकांच्या स्पर्धेच आयोजन करण्यात येणार आहे. पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी, श्रीलंकेचा कुमार संगकारा, इंग्लंडच्या इयॉन मॉर्गन यांच्यासह भारताचा धमाकेदार फलंदाज वीरेंद्र सेहवाग देखील या स्पर्धेत खेळणार असल्याचे समजते. पण याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

या स्पर्धेत ९० मिनिटांच्या सामन्यात दोन्ही संघांना प्रत्येकी १० षटके मिळतील. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तानी व्यावसायिक सलमान इकबाल आयोजित करणार आहेत. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझीम शेठी यांनी ट्विटच्या माध्यमातून या आगामी स्पर्धेला पाठिंबा दर्शवला आहे. अनेक कंपन्यांचे भागधारक या स्पर्धेसाठी उत्सुक आहेत, असा उल्लेखही त्यांनी ट्विटमध्ये केला.
प्रत्येकजण टी-१० क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास स्पर्धेचे आयोजक सलमान इकबाल यांनी व्यक्त केला. २१ डिसेंबर ते २४ डिसेंबर या चार दिवसांत खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार मिसबाह उलहक आणि बांगलादेशचा शकीब अल हसन देखील सहभागी होणार आहे.

आफ्रिदीने या संकल्पनेला पसंती दिली. स्पर्धेविषयी तो म्हणाला की, मला या स्पर्धेची कल्पना खूपच आवडली. ज्यावेळी या स्पर्धेबद्दल सांगण्यात आले. त्यावेळी मला खेळण्याची संधी मिळावी, अशी विनंती केल्याचे त्याने सांगितले. याशिवाय मॉर्गनने देखील ही स्पर्धा यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तो म्हणाला, टी-२० स्पर्धेला सुरुवातीपासून ते आतापर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे आपण अनुभवले आहे. या स्पर्धेप्रमाणेच ही स्पर्धा देखील लोकप्रिय होईल, असे तो म्हणाला.