अनुभवी हॉकीपटू गुरबाज सिंग याच्यावरील नऊ महिन्यांची बंदी हटवण्याचा निर्णय हॉकी इंडियाने (एचआय) शनिवारी घेतला. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने गुरबाजवरील बंदी बेकायदेशीर असल्याचे नमूद केल्यानंतर हॉकी इंडियाला हा निर्णय घ्यावा लागला. माजी हॉकीपटू हरबिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली हॉकी इंडियाच्या वाद आणि तक्रार निवारण समितीने गुरबाजला नऊ महिन्यांच्या निलंबनाची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात गुरबाजने न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाच्या सर्व बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने गुरबाजवरील बंदी चुकीची असल्याचा निर्णय दिला. संघात मतभेद आणि गट निर्माण करण्याचा आरोप गुरबाजवर ठेवण्यात आला होता. ‘‘या वेळी गुरबाजला आम्ही ताकीद देत आहोत. भविष्यात गैरवर्तन झाल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात वरिष्ठ खेळाडूंकडून अशा चुका होणार नाहीत,’’ अशी आशा समितीने प्रकट केली. हॉकी इंडिया अजूनही गुरबाजला दोषी मानत आहे, परंतु न्यायालयाच्या आदेशापुढे त्यांच्यासमोर कोणताच पर्याय उरलेला नाही. या निर्णयानंतर गुरबाज म्हणाला, ‘‘हे सर्व काही विसरून पुन्हा नव्याने संघात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. माझ्यासमोर कोणताच पर्याय उरला नव्हता आणि म्हणून मी कायदेशीर मार्ग निवडला. ’’