नवीन वर्षांच्या सुरुवातीला जवळपास प्रत्येक जण काही ना काही तरी संकल्प बाळगत असतो. आपल्या वाढदिवशीही
संकल्प करणाऱ्यांची संख्या कमी नाही. २० जानेवारीला रंगणाऱ्या मुंबई मॅरेथॉनच्या दिवशी ‘धावा, निरोगी व्हा आणि तंदुरुस्त रहा’ हा संकल्प बाळगून तब्बल ८८ जण आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. मॅरेथॉन, अर्धमॅरेथॉन आणि ड्रीमरन या गटांमध्ये १५ ते ८० वयोगटातील स्पर्धक आपला संकल्प पूर्ण करणार आहेत.
आपला वाढदिवस संस्मरणीय ठरवण्यासाठी त्यांची कसून तयारी सुरू आहे. मॅरेथॉनसह ‘बार बार दिन ये आए’, अशीच या सर्वाची इच्छा असेल. ‘‘२००८मध्येच वाढदिवशी धावण्याचे मी ठरवले होते. गेली चार वर्षे मी सलग मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहे. योगायोगाने या वर्षीही ही स्पर्धा २० जानेवारीला होत आहे, याचा आनंद आहे. या वर्षी मी पूर्ण मॅरेथॉन शर्यतीत धावणार असून त्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून दररोज ३-४ तास माझा सराव सुरू आहे,’’ असे ४१ वर्षांच्या उमेश नाईक याने सांगितले. ८० वर्षांचे नवनीतलाल शाह हेसुद्धा ज्येष्ठ नागरिकांच्या शर्यतीत सहभागी होणार आहेत. ‘‘वाढदिवसाच्या निमित्ताने या वयातही आपण किती तंदुरुस्त आहोत, हा संदेश तरुण वर्गापर्यंत पोहोचवण्याचा माझा मानस आहे,’’ असे नवनीतलाल म्हणतात.
‘‘मुंबई मॅरेथॉनमध्ये कोण सहभागी होणार, याची चाचपणी ऑफिसमध्ये सुरू होती. माझ्या वाढदिवशीच ही शर्यत होणार असल्यामुळे आपल्या आयुष्यातील मौल्यवान असा हा दिवस संस्मरणीय ठरवण्यासाठी मी या शर्यतीत भाग घेतला. पहिल्यांदाच अर्ध मॅरेथॉनमध्ये धावणार असल्यामुळे कसलीही कल्पना नाही. पण मी दररोज १० ते १२ किलोमीटर धावत असतो,’’ असे जेबी केमिकल्स आणि फार्मास्युटिकल्स कंपनीत कार्यरत असलेल्या ५१ वर्षांच्या विनायक पार्सेकर यांनी सांगितले.

मुंबई मॅरेथॉनच्या मार्गात बदल नाही
मुंबई मॅरेथॉनच्या मार्गात कोणताही बदल करण्यात आला नसून पूर्ण मॅरेथॉन शर्यतीला (४२ कि.मी.) छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुरुवात होईल. राजीव गांधी सागरी सेतूवरून परतीच्या मार्गाने छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे शर्यत संपेल. अ‍ॅथलीट्सना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आठ अ‍ॅम्ब्युलन्स आणि ३५० डॉक्टर तैनात ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांसह १९५० पोलिस आणि एक हजार खाजगी सुरक्षारक्षक बंदोबस्तासाठी असतील.