* मुंबई सलग १६व्या वर्षी इराणी जेतेपदापासून वंचित
* अंबाती रायुडूचे दिमाखदार शतक
* ४१३ धावांच्या एकंदर आघाडीसह शेष भारताचा वरचष्मा
इराणी करंडक क्रिकेट स्पर्धा

मुंबईने १९९७-९८च्या मोसमामध्ये इराणी करंडक जिंकण्याची किमया साधली होती. त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यात आता १६व्या वर्षी मुंबई अपयशी ठरणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मुंबईची स्थानिक क्रिकेटमधील दादागिरी पुन्हा रणजी जेतेपदापर्यंत सीमित राहणार, हे शनिवारीच स्पष्ट झाले आहे. इराणी सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर शेष भारताने दुसऱ्या डावात ४ बाद २९६ अशी मजल मारत आपली एकंदर आघाडी ४१३ धावांपर्यंत वाढवली आहे. आता रविवारी अखेरच्या दिवशी शेष भारताने डाव घोषित केला तरी मुंबईला दुसऱ्या डावात हे आव्हान पेलवणे कठीण जाणार आहे. तथापि, सामन्याची रंगत हरवलेल्या चौथ्या दिवसावर अंबाती रायुडूने नाबाद शतक झळकावून आपली छाप पाडली.
शनिवारी मुंबईच्या गोलंदाजांनी नाइट वॉचमन एस. श्रीशांत आणि मुरली विजय यांना झटपट बाद करीत शेष भारताची ३ बाद ६७ अशी अवस्था केली होती. पण प्रारंभी मिळविलेले हे नियंत्रण टिकविण्यात त्यांना अपयश आले. मग अंबाती रायुडूने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १४वे शतक झळकावले. दिवसअखेपर्यंत २६५ मिनिटे किल्ला लढवत २१७ चेंडूंत ९ चौकार आणि ४ दिमाखदार षटकारांच्या सहाय्याने ११८ धावांवर रायुडू खेळत आहे. त्याने शेष भारताचा डाव सावरताना दोन महत्त्वाच्या भागीदाऱ्या रचल्या. आधी रायुडूने मनोज तिवारीसोबत चौथ्या विकेटसाठी १४० धावांची भागीदारी रचली. पण तिवारी (६९) बाद झाल्यानंतर त्याने पहिल्या डावातील शतकवीर सुरेश रैनासोबत जोडी जमवली. खेळ थांबला तेव्हा रैना ४ चौकार आणि २ षटकारांसह ४० धावांवर खेळत होता.
आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या रायुडूच्या फलंदाजीत शनिवारीही तीच धडाकेबाज झलक दिसत होती. महिन्याभरापूर्वी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या रणजी करंडक स्पध्रेच्या उपांत्य सामन्यात मुंबईच्या सहाशे धावांच्या डोंगरापुढे बडोद्याचा डाव कोसळला होता. त्यावेळी याच रायुडूने सर्वाधिक ८९ धावांची झुंजार खेळी साकारली होती. यंदाच्या रणजी हंगामातही रायुडूचे हेच धावांचे सातत्य दिसून आले. त्याने ८ सामन्यांत एक शतक आणि सात अर्धशतकांनिशी ६६६ धावा काढून आपले नाणे खणखणीत असल्याची ग्वाही दिली होती. यष्टीरक्षणाची जबाबदारीही लीलया सांभाळणारा २७ वर्षीय रायुडूही भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी उत्सुक आहे.
मोठय़ा खेळी साकारण्याचे लक्ष्य – अंबाती रायुडू
‘‘शतकाचा आनंद सर्वानाच होतो, तसा मीसुद्धा या शतकाने आनंदित आहे. पहिल्याच इराणी करंडक सामन्यात शतक झळकावल्याने हा आनंद द्विगुणीत झाला आहे. पण आतापर्यंत प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये काढलेल्या पाच हजार धावांमध्ये फक्त १४ शतकांचा समावेश असल्याने थोडासा निराशही आहे. मला अर्धशतकांचे रूपांतर शतकांमध्ये फार कमी वेळा करता आले आहे. पण यानंतर मोठय़ा खेळी कशा साकारल्या जातील याकडे माझे लक्ष असेल,’’ असे इराणी करंडक सामन्यातील चौथा शतकवीर अंबाती रायुडूने सामन्यानंतर सांगितले.
‘‘सकाळी पहिल्या तासात गोलंदाजीचा सामना करणे सोपे नव्हते, त्यावेळी आमची खरी परीक्षा ठरली. पण त्यावेळी खेळपट्टीवर जास्तीत जास्त वेळ पाय रोवून उभे राहायचे ठरवले होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात चेंडू बॅटवर सहज येत होता, त्याचा चांगलाच फायदा उचलला,’’ असे रायुडू म्हणाला.
‘‘मुंबईने अजून जिंकण्याची आशा सोडलेली नाही,’’ असे सांगण्याचा मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने प्रयत्न केला. तो पुढे म्हणाला, ‘‘ क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. शेष भारताने जर डाव घोषित केला, तर नक्कीच आम्ही धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू.’’  

सचिन गैरहजर!
शतकी खेळी साकारल्यावर सचिन तेंडुलकर सामन्याच्या चौथ्या दिवशीही मैदानात गैरहजर होता. शतक साकारल्यावर सचिन शुक्रवारी क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता, तर चौथ्या दिवशीही सचिनचे मैदानात दर्शन झाले नाही. सचिनला पाहण्यासाठी शनिवारी बरीच पावले वानखेडेवर वळली होती, पण त्यांचा पुरता हिरमोडच झाला. सचिनबाबत धवलला पत्रकार परिषदेमध्ये विचारल्यावर ‘‘सचिन पूर्णपणे फिट आहे,’’ असे तो म्हणाला. पण सचिन जर पूर्णपणे फिट असेल तर तो मैदानात का उतरला नाही, याचे उत्तर मात्र कोणाकडेही नव्हते.

संक्षिप्त धावफलक
शेष भारत (पहिला डाव) : ५२६
मुंबई (पहिला डाव) : ४०९
शेष भारत (दुसरा डाव) : ९५ षटकांत ४ बाद २९६ (मनोज तिवारी ६९, अंबाती रायुडू खेळत आहे ११८, सुरेश रैना खेळत आहे ४०).