आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान पदक नाकारल्यामुळे तात्पुरती बंदीची शिक्षा ओढवून घेतलेल्या एल. सरिता देवीप्रकरणी क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी नवी दिल्लीत चर्चा केली. या वेळी सरिताला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देतानाच भारतवासीयांनीही तिच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, असे सचिनने सांगितले.
‘‘सरिता देवी प्रकरणाविषयी चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. एक खेळाडू या नात्याने सरिता सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहे, याची मला कल्पना आहे. हा तिच्यासाठी सर्वात खडतर काळ आहे. या घटनेविषयी प्रत्येक जण विभिन्न मत मांडत आहे. तिने जागतिक बॉक्सिंग संघटनेची (एआयबीए) माफी मागितली आहे. त्यामुळे यापुढे कोणती पावले उचलावीत, हे या बैठकीत ठरवण्यात आले,’’ असे सचिन म्हणाला.
‘‘संपूर्ण देशवासीयांनी तिला पाठिंबा देण्याची गरज आहे. बॉक्सिंग इंडिया तसेच क्रीडा मंत्रालयाने तिला भक्कम पाठिंबा दिला आहे. त्यामुळे योग्य दिशेने हे प्रकरण हाताळण्यासाठी आम्ही एकत्र जमलो होतो,’’ असेही त्याने सांगितले. क्रीडामंत्री म्हणाले की, ‘‘सरिता देवीच्या प्रकरणाचा पुनर्विचार करण्यात यावा, यासाठी सरकारकडून एआयबीएशी चर्चा केली जाणार आहे. देशातील जनतेने तिला पाठिंबा दिल्यामुळे हे प्रकरण आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.’’
सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अव्वल बॉक्सर एम. सी. मेरी कोम, विजेंदर सिंग तसेच भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष एन. रामचंद्रन, बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जजोडिया आणि राष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक गुरबक्ष सिंग संधू हे शास्त्री भवनात उपस्थित होते.
वाद टाळण्यासाठी एआयबीएने पुनर्आढावा घ्यावा -गौडा
बंगळुरू : खेळाडूंना बंदी टाकण्यासारखे वादग्रस्त प्रकार टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने आपल्या नियमांचा पुनर्आढावा घेण्याची गरज आहे, असे सांगत भारताचा आघाडीचा थाळीफेकपटू विकास गौडाने सरिता देवीच्या पारडय़ात आपले मत टाकले आहे.
‘‘दोन जणांच्या लढतीत कोणताही एक खेळाडू विजेता होत असतो. पण पंचांनी मात्र हरणाऱ्या खेळाडूला विजेता ठरवणे योग्य नाही. सामना जिंकला असतानाही पराभूत व्हावे लागणे, ही कोणत्याही खेळाडूसाठी निराशाजनक बाब आहे. याला पंचांचे राजकारण कारणीभूत आहे. त्यामुळे सरिता देवीची निराशा मी समजू शकतो. बॉक्सिंगमध्ये पंचांच्या कामगिरीविषयी नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित होते. मी बॉक्सिंग हा खेळ जवळून पाहत आलो आहे. त्यामुळे लढतीदरम्यान कोण विजेता होईल, हे मी सहजपणे सांगू शकतो. त्यामुळे सरिता देवी त्या सामन्यात विजयी ठरणार होती, हे सांगण्याची गरज नाही,’’ असे गौडाने सांगितले.
२०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या मनोज कुमारला आज अर्जुन पुरस्कार मिळाला आहे, असे हा पुरस्कार नाकारणाऱ्या कपिल देव यांना मला सांगायचे आहे. माझे नाव यादीतून काढून टाकत तुम्ही कांस्यपदक मिळवणाऱ्या जय भगवानला हा पुरस्कार का दिला, आहे, असे फोनवरून विचारल्यावर कपिल देव यांनी फोन कट केला होता.
– मनोज कुमार