जागतिक स्तरावरील माझी पहिलीच स्पर्धा असली तरी माझ्यावर कोणतेही दडपण नाही. आत्मविश्वासाच्या जोरावर मी चौदा वर्षांखालील गटाच्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत किमान कांस्यपदक मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे येथील उदयोन्मुख खेळाडू आकांक्षा हगवणे हिने ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीला सांगितले.
आकांक्षा हिने त्रिचूर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय सबज्युनिअर स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले. या कामगिरीमुळे तिची आगामी जागतिक स्पर्धा व त्यानंतर होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. डीईएस टिळक रोड प्रशालेत नवव्या इयत्तेत शिकत असलेल्या या खेळाडूने गतवर्षी तेरा वर्षांखालील गटात विजेतेपद मिळविले होते. यंदा तिचे विजेतेपद थोडक्यात हुकले.
जागतिक स्पर्धेसाठी कशी तयारी करीत आहे असे विचारले असता आकांक्षा म्हणाली, आंतरराष्ट्रीय मास्टर जयंत गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली मी दररोज चार ते पाच तास सराव करीत आहे. वेगवेगळय़ा ओपनिंगवर मी लक्ष केंद्रित करीत आहे. तसेच मला ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्याकडूनही अधूनमधून मौलिक सल्ला मिळत असतो. एकाग्रता वाढविण्यासाठी मला देबश्री मराठे हिच्याकडूनही मार्गदर्शन मिळत आहे.
जागतिक स्पर्धेत तुझ्यापुढे कोणत्या देशांचे प्रामुख्याने आव्हान आहे, या प्रश्नावर आकांक्षा म्हणाली, मला प्रामुख्याने रशिया व चीन या देशांच्या खेळाडूंचे आव्हान असणार आहे. संभाव्य प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या शैलीचा मी बारकाईने अभ्यास करीत आहे. तसेच इंटरनेट माध्यमाचाही मला त्यासाठी उपयोग होत असतो. बचावात्मक तंत्राने खेळणाऱ्या खेळाडूविरुद्ध सुरुवातीपासून आक्रमक व्यूहरचना करण्याचा माझा प्रयत्न राहील. आक्रमक खेळ करणाऱ्यांविरुद्ध मी डावाच्या मध्यास आक्रमक प्रत्युत्तर देणार आहे.
आकांक्षाची यंदा बुद्धिबळ प्रीमिअर लीगसाठी निवड झाली होती. या स्पर्धेतील अनुभवाविषयी आकांक्षा म्हणाली, या स्पर्धेत प्रामुख्याने सांघिक समन्वयास अधिक महत्त्व असल्यामुळे मला वेगळाच अनुभव शिकावयास मिळाला. ज्येष्ठ खेळाडू अनुप देशमुख, आंतरराष्ट्रीय खेळाडू बी. अधिबन, विष्णू प्रसन्ना, एस. एल. नारायणन आदी खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या खेळातून मला खूप शिकावयास मिळाले.
आकांक्षा हिला डीईएस टिळक रोड प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुजाता नायडू यांचे खूप चांगले सहकार्य मिळत आहे. तिचा भाऊ हर्षल हादेखील बुद्धिबळपटू आहे. आईवडिलांकडून आम्हा दोघांनाही या खेळात करीअर करण्यासाठी भरपूर सहकार्य व प्रोत्साहन मिळत असते असे आकांक्षा म्हणाली. फ्रेंच डिफेन्स हा तिचा आवडता डाव आहे. मात्र सतत वेगवेगळे डावपेच करून पाहण्यासाठी तिचा प्रयत्न सुरू आहे. संयम, चिकाटी, आत्मविश्वास याच्या जोरावर तिला सर्वोत्तम यश मिळवायचे आहे. भारताचा पाच वेळा विश्वविजेतेपद मिळविणारा विश्वनाथन आनंद याचा आदर्श तिच्यापुढे आहे. त्याच्याप्रमाणेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचा नावलौकिक उंचावण्याचे तिचे ध्येय आहे.