एअर इंडिया, ओएनजीसी, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, भारत पेट्रोलियम आणि विजया बँक या संघांनी ८व्या औद्योगिक पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेत पहिल्या विजयाची नोंद केली. भिवंडी येथील स्वर्गीय अजित पाटील क्रीडांगणावर ही स्पर्धा सुरू आहे.
राष्ट्रीय स्पध्रेच्या ‘अ’ गटात गतविजेत्या एअर इंडियाने एचएएल (बंगळुरू) संघाचा ७०-१९ असा धुव्वा उडविला. मध्यंतराला ३९-६ अशी मोठी आघाडी घेत एअर इंडियाने आपला इरादा स्पष्ट केला. दीपक हुडा, तुषार पाटील, प्रशांत चव्हाण या दिग्गज खेळाडूंबरोबर नवनाथ जाधवने दमदार खेळ करून एअर इंडियाचा विजय पक्का केला. बंगळुरू संघाकडून रघुनाथ व विशाल यांनी संघर्ष केला. ‘ब’ गटातील ओएनजीसी (गुजरात) संघाने मुंबईच्या आरसीएफला २७-७ असे सहज नमविले. दीपक नरवाल, संदीप नरवाल यांच्या चतुरस्र खेळामुळे हा विजय साकारला. बंगळुरूच्या सीपीईएससीव्हीने दिल्लीच्या भावना इंडस्ट्रीजला ४७-१८ असे पराभूत केले.
महिलांच्या राज्यस्तरीय स्पध्रेच्या ‘अ’ गटात मुंबईच्या अमरहिंदने पुण्याच्या ओम साईला २६-१६ असे पराभूत केले. मध्यंतराला ६-५ अशी नाममात्र आघाडी घेणाऱ्या अमरहिंदने जोरदार खेळ करत १० गुणांनी सामना आपल्या बाजूने फिरवला. अमरहिंदकडून दिव्या यादव तर ओम साईकडून शिल्पा कारळे यांनी उत्तम खेळ केला. ‘ब’ गटात उपनगरच्या संघर्षने पुण्याच्या सुवर्णयुगवर १५-६ अशी मात केली. कोमल देवकरने दमदार खेळ केला.