* प्रार्थना ठोंबरेची रिओसाठी निवड
* बोपण्णाच्या पसंतीला आयटाचा नकार
भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएण्डर पेसचा रिओवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. अखिल भारतीय टेनिस संघटनेने (आयटा) रिओवारीसाठी भारतीय टेनिस संघ जाहीर केला. या संघात पेसचा समावेश करण्यात आला असल्यामुळे त्याचे विक्रमी सातव्यांदा ऑलिम्पिकवारी करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे. पेस-बोपण्णा पुरुष दुहेरीत एकत्र खेळतील. मिश्र दुहेरीत बोपण्णा आणि सानिया मिर्झा भारताचे प्रतिनिधित्व करतील. महिला दुहेरीत सानियाच्या जोडीला महाराष्ट्राची प्रार्थना ठोंबरे खेळणार आहे. सोलापूरजवळच्या बार्शीच्या प्रार्थनाची ही पहिलीच ऑलिम्पिकवारी असणार आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान पटकावणाऱ्या रोहन बोपण्णाने साकेत मायनेनीचे नाव सुचवले होते. मात्र आयटाने पुरुष दुहेरीसाठी बोपण्णा-पेस जोडीलाच खेळवण्याचे डावपेच आखले आहेत. काही महिन्यांपूर्वी डेव्हिस चषक स्पर्धेत चेक प्रजासत्ताकविरुद्धच्या लढतीत पेस-बोपण्णा जोडीचा दारुण पराभव झाला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही जोडी यशस्वी ठरलेली नाही. मात्र पेसचा अनुभव उपयुक्त ठरू शकतो या बळावर आयटाने बोपण्णाची मागणी फेटाळत पेससह खेळण्याची सक्ती केली आहे.
लंडन ऑलिम्पिकच्या वेळी सानिया मिर्झाला पेसच्या बरोबरीने खेळण्याची सक्ती करण्यात आली होती. यंदा सानियाने मिश्र दुहेरीसाठी बोपण्णाच्या तर महिला दुहेरीसाठी प्रार्थना ठोंबरेच्या नावाला पसंती दिली होती. आयटाने सानियाच्या दोन्ही मागण्या मान्य केल्या आहेत.
पेस आणि बोपण्णा यांच्यातील बेबनाव दूर व्हावा यासाठी आयटाने पुढील महिन्यात होणाऱ्या डेव्हिस चषक स्पर्धेसाठी दोघांचा भारतीय संघात समावेश केला आहे. आयटाने झीशान अली यांची ऑलिम्पिकसाठीच्या भारतीय संघाचे कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.
आयटाने संघनिवड घोषित केल्यानंतर बोपण्णाने निवेदन प्रसिद्ध केले आहे. ‘माझ्या खेळाचा, उणिवांचा विचार करून मी साकेतचे नाव सुचवले होते. पेस निश्चितच दिग्गज खेळाडू आहे. मात्र आम्हाला एकत्रित खेळताना अपेक्षित यश मिळू शकलेले नाही. आमची शैली भिन्न आहे. मात्र आयटानेही विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे. मी त्याचा आदर करतो. ऑलिम्पिकमध्ये पेससह खेळेन’, असे रोहनने स्पष्ट केले. रोहनच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे लंडन ऑलिम्पिकच्या वेळी झालेली शाब्दिक चिखलफेक आणि कलगीतुरा यंदा टळला आहे.
‘इतिहास बाजूला ठेवून नव्याने विचार करण्याची योग्य वेळ आहे. लिएण्डर आणि रोहन जोडीकडे ऑलिम्पिक पदक मिळवण्याची क्षमता आहे. हे निश्चितच खडतर आव्हान आहे. मात्र हे दोघेही गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत. मतभेद बाजूला सारून खेळण्यासाठी ही जोडी सज्ज आहे’, असे झीशान यांनी सांगितले.