डेव्हिस लढतींवर बहिष्कार घालण्याचा इशारा देणाऱ्या भारताच्या अव्वल टेनिसपटूंबरोबर तडजोड करण्याची अखिल भारतीय टेनिस महासंघाने (एआयटीए) तयारी दर्शविली आहे. महासंघाने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. त्यानुसार २०१३च्या डेव्हिस चषक लढतींकरिता नंदन बाळ यांच्याऐवजी झिशान अली यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बंडखोर खेळाडूंनी युकी भांब्रीचे प्रशिक्षक आदित्य सचदेव यांची शिफारस केली होती, मात्र महासंघाने डेव्हिस लढतींचा अनुभव असलेल्या झिशान अली यांना प्राधान्य दिले आहे. संघाचे न खेळणारे कर्णधार एस. पी. मिश्रा यांच्याऐवजी नवीन व्यक्तीची नियुक्ती करण्याचेही महासंघाने मान्य केले आहे. दक्षिण कोरियाबरोबर होणाऱ्या डेव्हिस चषक लढतीनंतर ही नियुक्ती केली जाणार आहे. महासंघाच्या कार्यकारिणीत तडजोडीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. त्यानुसार डेव्हिस प्राथमिक गटाच्या लढतीच्या उत्पन्नाच्या ५० ते ६० टक्के वाटा खेळाडूंना दिला जाणार आहे. जागतिक लढतींच्या उत्पन्नापैकी ७० टक्के उत्पन्न खेळाडूंना दिले जाणार आहे. मात्र खेळाडूंबरोबर पूर्वी केलेल्या करारानुसार ही रक्कम खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक यांच्यात वाटली जाईल.