डेव्हिस चषक संयोजनासंदर्भात टेनिसपटूंनी मांडलेल्या मागण्यांचा विचार करताना एआयटीएची भूमिका व्यावसायिक आणि नैतिकतेला धरून नसल्याची टीका सोमदेव देववर्मनने केली आहे. सोमदेवच्या नेतृत्वाखाली आठ टेनिसपटूंनी आपल्या मागण्यांसाठी डेव्हिस चषकावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता.
‘एआयटीएची भूमिका अव्यावसायिक आणि नैतिकतेशी फारकत घेणारी आहे. त्यामुळे खेळाडू निराश झाले आहेत. एआयटीएने मागण्यांच्या पूर्ततेसंबंधी अनेक दावे केले परंतु लिखित स्वरूपात आमच्यासमोर काहीही ठेवले नाही. आम्हाला हे सर्व लिखित स्वरूपातच हवे होते. एआयटीएचा इतिहास लक्षात घेता त्यांच्या तोंडी आश्वासनांवर विश्वास ठरणे चुकीचे ठरले असते’, असे सोमदेवने सांगितले.
६ जानेवारीला आम्हाला अंतिम मेल मिळाला. त्यामध्ये मागण्यांबाबत काहीही ठोस म्हटलेले नव्हते. प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलेल्या कोणत्याही गोष्टींचा मेलमध्ये उल्लेख नव्हता. संघटनेचे कामकाज कशा पद्धतीने चालते हे लक्षात येते असे तो पुढे म्हणाला. आम्ही मूलभूत हक्कांची मागणी केली होती आणि या मागण्यांबाबत एआयटीएची भूमिका व्यावसायिक असावी एवढीच आमची अपेक्षा होती. या मागण्या आम्हाला नेमक्या शब्दांत कार्यकारिणी समिती, निवड समिती किंवा एआयटीए यांच्यासमोर मांडता आल्या नाहीत यासाठी आम्ही निराश असल्याचे सोमदेवने बंडखोर टेनिसपटूंच्या वतीने सांगितले.
लेखी प्रकारात मागण्यांच्या पूर्ततेविषयी हमी मिळाली असती तर सर्व खेळाडू डेव्हिस चषकासाठी उपलब्ध झाले असते. आताही एआयटीएने काहीही ठोस म्हटलेले नाही. एआयटीए आणि खेळाडूंमध्ये कोणताही संवाद नाही. पण एका अर्थाने जे घडले ते चांगलेच झाले. कारण गेली २० वर्षे हे असेच सुरू आहे. याविरोधाच एकत्र येऊन दाद मागण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. केवळ टेनिसच नव्हे तर क्रीडासंघटनांचे प्रशासन हा भारतात वादग्रस्त मुद्दा झाल्याची खंत सोमदेवने बोलून दाखवली.