ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी कितीही शाब्दिक हल्ले केले तरी त्याची आम्हाला चिंता नाही. कारण आम्ही ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक  खेळाडूसाठी वेगळी रणनिती आखली आहे, असे मत भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणेने सांगितले.

‘ऑस्ट्रेलियाचा संघ हा मानसीकता पाहून खेळत असतो. त्याचबरोबर ते फक्त कामगिरीच्या जोरावर जिंकण्याचा प्रयत्न करत नाहीत, तर सर्व मार्गाचा  अवलंब करतात. त्यामध्ये आम्हाला पडायचे नाही. आम्ही प्रत्येक खेळाडूसाठी रणनिती आखली आहे. या रणनितीचा योग्य अवलंब कसा करता येईल, यावर आमचे लक्ष असेल, असे अजिंक्य म्हणाला.

भारतात दाखल झाल्यावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने जिंकण्यासाठी आम्ही शाब्दिक बाणांचाही वापर करू शकतो, असे सुतोवाच केले होते. पण त्यानंतर विराट कोहलीवर शाब्दिक हल्ला करून चालणार नाही, असे मत ऑस्ट्रेलियाचा तडफदार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने व्यक्त केले होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आम्ही क्रिकेटमध्ये आक्रमकपणा दाखवणार असल्याचे रहाणेने सांगितले. याबाबत तो पुढे म्हणाला की, ‘आम्ही सकारात्मक क्रिकेट खेळण्यावर भर देणार आहोत. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू कुठे आक्रमकपणा दाखवणार, हे आम्हाला जाणीन घ्यायचे नाही. पण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांविरुद्ध खेळताना आम्ही नक्कीच आक्रमक असू. भारतातील खेळपट्टय़ांचा अभ्यास करून त्यांनी पाच फरकीपटू संघात ठेवले आहेत. पण आम्ही त्यांच्या गोलंदजीवर कडक प्रहार करण्याची सज्ज आहोत.’

दुखापतीनंतर पुनरागमनाविषयी रहाणे म्हणाला की, ‘दुखापतीमुळे जवळपास दोन महिने मी भारतीय संघापासून दूर होतो. त्यानंतर पुनरागमन करताना बांगलादेशविरुद्ध मी ८२ धावांची खेळी साकारली. या खेळीने माझा आत्मविश्वास उंचावला आहे. या खेळीचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी नक्कीच फायदा होईल.’