भारताच्या ४८१ धावांच्या लक्ष्यापुढे दक्षिण आफ्रिका ७२ षटकांत २ बाद ७२
अजिंक्य रहाणेचा कसोटी क्रिकेटमधील अनोखा ‘जागर’ क्रिकेटरसिकांनी अनुभवला. दोन्ही डावांमध्ये शतक झळकावण्याचा पराक्रम साधणाऱ्या रहाणेच्या फलंदाजीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी ४८१ धावांचे लक्ष्य दिले. मात्र कर्णधार हशिम अमला आणि ए बी डी’व्हिलियिर्स यांनी खेळपट्टीवर नांगर टाकत कासवगतीने ७२ षटकांत २ बाद ७२ धावा केल्या. त्यामुळे एकीकडे भारतीय संघाला चौथ्या कसोटीसह मालिकेत ३-० अशी ऐतिहासिक विजयाची उमेद आहे, तर दुसरीकडे आफ्रिकेच्या उर्वरित आठ फलंदाजांना पराभव टाळण्यासाठी सोमवारी संपूर्ण दिवस जिद्दीने किल्ला लढवावा लागणार आहे.
फिरोझशाह कोटला स्टेडियमवर रहाणेने पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही आपली छाप पाडली. रहाणेने २०६ चेंडूंत १०० धावा करताना कसोटी कारकीर्दीतील सहावे शतक झळकावले. रहाणेने शतकाचा टप्पा गाठताच कर्णधार विराट कोहलीने भारताचा डाव घोषित केला.
भारतीय संघाला कसोटी विजयाची अपेक्षा असली तरी कोटलाची खेळपट्टी धिमी आणि फिरकीला साथ कमी देत आहे. त्यामुळे रवींद्र जडेजा (२३ षटकांत १० धावा) आणि रविचंद्रन अश्विन (२३ षटकांत २९ धावांत २ बळी) यांना सोमवारी उरलेले आठ फलंदाज बाद करणे आव्हानात्मक ठरू शकेल.
दक्षिण आफ्रिकेने चौथी कसोटी अनिर्णीत राखण्याच्या इराद्याने अतिशय कूर्मगतीने फलंदाजी केली. प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर ‘हमला’ करणारा फलंदाज अशी ओळख जपणाऱ्या अमला अतिबचावात्मक पवित्रा स्वीकारत २०७ चेंडूंत फक्त २३ धावा केल्या. डी’व्हिलियर्सनेही बचावाचा ‘अमलामार्ग’ अमलात आणून ९१ चेंडूंत केवळ ११ धावा केल्या. या अमला-डी’व्हिलियर्स जोडीने २९.२ षटके भारतीय गोलंदाजांना झगडायला लावून जेमतेम २३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने ३३ षटकांच्या अखेरच्या सत्रात फक्त ३२ धावा केल्या.

धावफलक
भारत (पहिला डाव) : ३३४
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : १२१
भारत (दुसरा डाव) : मुरली विजय झे. व्हिलास गो. मॉर्केल ३, शिखर धवन त्रि. गो. मॉर्केल २१, रोहित शर्मा त्रि. गो. मॉर्केल ०, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. ताहीर २८, विराट कोहली पायचीत गो. अ‍ॅबॉट ८८, अजिंक्य रहाणे खेळत नाबाद १००, वृद्धिमान साहा नाबाद २३, अवांतर (लेगबाइज २, नोबॉल २) ४, एकूण १००.१ षटकांत ५ बाद २६७.
बाद क्रम : १-४, २-८, ३-५३, ४-५७, ५-२११.
गोलंदाजी : मॉर्नी मॉर्केल २१-६-५१-३, कायले अ‍ॅबॉट २२-९-४७-१ डेन पीट १८-१-५३-०, इम्रान ताहीर २६.१-४-७४-१, डीन एल्गर १३-१-४०-०.
दक्षिण आफ्रिका (दुसरा डाव) : डीन एल्गर झे. रहाणे गो. अश्विन ४, टेंबा बवुमा त्रि. गो. अश्विन ३४, हशिम अमला खेळत आहे २३, ए बी डी’व्हिलियर्स खेळत आहे ११, एकूण ७२ षटकांत २ बाद ७२.
बाद क्रम : १-५, २-४९.
गोलंदाजी : इशांत शर्मा १२-७-१६-०, रविचंद्रन अश्विन २३-१३-२९-२, रवींद्र जडेजा २३-१६-१०-०, उमेश यादव ९-६-६-०, शिखर धवन ३-१-९-०, मुरली विजय २-०-२-०.

अमलाने आफ्रिकेला उत्तम ‘मार्ग’दर्शन केले
नवी दिल्ली : भारतीय फिरकीचे दडपण झुगारून कसोटी सामना वाचवण्यासाठी हशिम अमलाने आफ्रिकेला उत्तम ‘मार्ग’दर्शन घडवले आहे, असे मत सलामीवीर टेंबा बवुमाने व्यक्त केले आहे. ‘‘भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांपेक्षा ही खेळपट्टी अधिक बरी आहे. त्यामुळे आम्ही भारताशी निर्धाराने लढा देऊ शकलो आहे. सोमवारी या पद्धतीने दिवसभर खेळून काढत पराभव टाळू, अशी अपेक्षा आहे,’’ असे बवुमाने सांगितले.

आफ्रिकेची आश्चर्यकारक रणनीती, पण..
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांच्या अतिबचावात्मक रणनीतीबाबत भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने आश्चर्य प्रकट केले. आफ्रिकेसारख्या संघाने ७२ षटकांत ७२ धावा करणे, हे धक्कादायक आहे. फटके खेळण्याचा कोणताही मोह ते स्वीकारत नव्हते. मात्र पाचवा संपूर्ण दिवस मैदानावर टिकाव धरून सामना वाचवणे मुश्किल आहे, असे यादवने सांगितले.‘‘फलंदाज फटका खेळायचे टाळत असल्याने तो बाद होण्याची शक्यता कमी होते. गोलंदाजांसाठी हे आव्हानात्मक असते. या प्रकारचे क्रिकेट हे कंटाळवाणे असते. कारण फक्त षटकांमागे षटके संपत आहे आणि काहीच घडत नाही,’’ अशी प्रतिक्रिया यादवने व्यक्त केली.

मुरली विजयला दंड
पंचांनी दिलेल्या निर्णयाबाबत नाराजी प्रकट करणारा भारताचा सलामीवीर मुरली विजयला दंड ठोठावण्यात आला आहे. विजयने आयसीसीच्या आचारसंहितेच्या पहिल्या स्तरावरील नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्याच्या सामन्याच्या मानधनाची ३० टक्के रक्कम दंड म्हणून आकारण्यात येणार आहे. मॉर्नी मॉर्केलच्या गोलंदाजीवर यष्टीपाठी झेलबाद असल्याचा कौल पंचांनी दिल्यानंतर पॅव्हेलियनकडे परतताना विजयने या निर्णयाबाबत नाराजी प्रकट केली होती.