भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अजिंक्य रहाणेने दमदार शतकी खेळी केली. या सामन्यात १०४ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने त्याने १०३ धावा केल्या. या बहरदार खेळीसह कॅरेबियन मैदानात द्रविडनंतर शतकी खेळी करणारा तो दुसरा सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी सबिना पार्क मैदानावर राहुल द्रविडने शतकी खेळी केली होती. वीरेंद्र सेहवागसोबत डावाला सुरुवात करताना द्रविडने १०२ चेंडूत १०५ धावा ठोकल्या होत्या. या खेळीत त्याने १० चौकार २ षटकारांचा समावेश होता. द्रविडच्या खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजला पाच गडी आणि एक चेंडू राखून पराभूत केले होते.

रविवारी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये रंगलेल्या सामन्यात रहाणेच्या खेळीतही द्रविडच्या खेळीची झलक पाहायला मिळाली. रहाणेच्या फटकेबाजीत संयम आणि आक्रमकता याचा सुरेख मिलाफ दिसत होता. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळून देखील त्याला मैदानात उतरण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर रोहित शर्माऐवजी रहाणेला सलामीवीर म्हणून संघात स्थान मिळाले आहे. या संधीचा योग्य फायदा उचलत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली. रहाणेने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात स्वत:ला सिद्ध केले आहे. तो सलामीवीर आणि मध्य फळीतील जबाबदारी सक्षमपणे पार पाडू शकतो.

रहाणे सलामीवीर म्हणून फलंदाजी करण्याची ही पहिली वेळ नाही. त्याने यापूर्वीही भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली आहे. याशिवाय आयपीएल स्पर्धेत पुण्याच्या संघाकडून खेळताना देखील तो सलामीवीर म्हणून मैदानात उतरला होता. आतापर्यंत अजिंक्यने ७५ एकदिवसीय सामन्यात भारताकडून प्रतिनिधित्व केले असून, यात त्याने ३ शतके आणि १७ अर्धशतके झळकावली आहेत. अजिंक्य रहाणे, धवन आणि कोहली यांच्या खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजला तब्बल १०५ धावांनी पराभूत केले. कॅरेबियन मैदानात वेस्ट इंडिजला मोठ्या फरकाने पराभूत करण्याचा विक्रम ही या सामन्यात प्रस्थापित झाला. यापूर्वी भारताने २००३ साली वेस्ट इंडिजला १०२ धावांनी पराभूत केले होते.